पर्यटकांना लवकरच स्कुबा गियरशिवाय समुद्राच्या अद्भुत दुनियेचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. भारतीय नौदलाच्या निवृत्त युद्धनौका INS गुलदार च्या आधारे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) एक नाविन्यपूर्ण प्रकल्प राबवत आहे. यामध्ये अत्याधुनिक पाणबुडी (submersible) च्या सहाय्याने पर्यटकांना मालवणजवळील निवती रॉक्स येथे समुद्रतळाचा रोमांचक प्रवास घडवून आणण्यात येणार आहे.
समुद्री पर्यटनाला चालना
या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील समुद्री पर्यटन वाढणार असून पर्यटकांना विविध रंगीबेरंगी प्रवाळ (coral reefs), जलचर प्राणी आणि ऐतिहासिक युद्धनौकेचे अवशेष जवळून पाहण्याची संधी मिळणार आहे.
INS गुलदार
निवृत्त झालेली INS गुलदार येत्या १५ दिवसांत निवती रॉक्सजवळ पाण्यात उतरवली जाणार, जी सिंधुदुर्ग किल्ल्यापासून सुमारे १० नॉटिकल मैलांवर असेल.
जहाजातील तेल, अॅस्बेस्टोससारख्या हानिकारक पदार्थांचे स्वच्छिकरण करूनच ती पाण्यात सोडण्यात येईल.जहाजाचे दरवाजे उघडण्यात येतील, त्यामुळे ते पाण्याने भरून सुमारे ५० मीटर खोल समुद्रतळाशी स्थिर बसेल. INS गुलदार एक कृत्रिम प्रवाळभित्ती (artificial reef) बनणार, जी जलचर जीवसृष्टीला आधार देईल आणि समुद्रातील जैवविविधता वाढवेल.
या प्रकल्पाचा खर्च
या प्रकल्पाचा एकूण खर्च रु. ९७ कोटी आखण्यात आला असून यातील रु. ४७ कोटी – जहाजाच्या तयारीसाठी आणि पाण्यात उतरण्यासाठी केला जाईल. तर
रु. ५० कोटी पाणबुडी आणि त्यासाठी आवश्यक मदरशिप तयार करण्यासाठी वापरण्यात येईल. २२ आसनी अत्याधुनिक पाणबुडी तयार केली जाईल, ज्यामध्ये २ कर्मचारी आणि २० पर्यटक एकावेळी प्रवास करू शकतील. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ ३ महिन्यांत आंतरराष्ट्रीय निविदा काढणार असून माझगाव डॉक लिमिटेड यांना प्राधान्य दिले जाईल.
पुढील ७-८ महिन्यांत पाणबुडी कार्यान्वित होणार
अनोखी पर्यटन सफर मालवणहून सुरू होईल, जिथून पर्यटकांना मदरशिपने समुद्रातील डायव्ह साइटपर्यंत नेले जाईल. तिथून २२-सीटर पाणबुडीमध्ये प्रवेश करून पर्यटकांना INS गुलदारच्या जलमय दुनियेचे थेट दर्शन घेता येईल. पाणबुडी समुद्रतळाशी उतरत असताना, पर्यटकांना समुद्रातील निसर्गसौंदर्याचे आणि जलचरांच्या जीवनाचे मनोहारी दर्शन घेता येईल.
नवीन पर्यटनाची दिशा
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, महाराष्ट्रातील समुद्री पर्यटन क्षेत्रात एक नवे पर्व सुरू होईल. साहसी प्रवासाचा अनुभव घेणाऱ्या पर्यटकांसाठी ही संधी नक्कीच अविस्मरणीय ठरणार आहे.