करवीर : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यातील आंबेवाडी याठिकाणी एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये एका विवाहित महिलेने आपल्या वडिलांना शेवटचा कॉल करून पुलावरून नदीत उडी मारली. सुदैवाने त्या ठिकाणी पोहत असलेल्या मुलांनी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला पाण्यातून बाहेर काढल्यामुळे तिचा जीव वाचला आहे. यानंतर पोलिसांच्या मदतीने या महिलेला सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. हि घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली आहे.
या महिलेचे लग्न 2012 साली झालं असून ती आपल्या पतीसोबत करवीर तालुक्यातील आंबेवाडी याठिकाणी राहते. तिला एक नऊ वर्षांचा मुलगा देखील आहे. घरगुती कारणांमुळे पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणं होत होती. घटनेच्या दिवशीसुद्धा या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात भांडण झाले होते. या वादानंतर महिलेचा पती तिच्यावर रागावला होता. त्यानंतर तो तसाच आपल्या कामावर निघून गेला. यानंतर हि महिलासुद्धा आपल्या घरातून बाहेर पडली आणि थेट पंचगंगा नदीच्या पुलावर गेली.
त्या ठिकाणी जाऊन तिने रागाच्या भरात आपल्या वडिलांना फोन केला आणि ‘मी पंचगंगा नदीत जीव देत आहे. माझ्या मुलाचा सांभाळ करा’ असे म्हणत तिने नदीच्या पुलावरून थेट नदीत उडी मारली. यावेळी नदीत पोहणाऱ्या काही मुलांनी हा प्रकार पाहिला आणि त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन या महिलेला पाण्यातून बाहेर काढले आणि तिचा जीव वाचवला. यानंतर पोलिसांना याची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या महिलेचे समुपदेशन केले. तसेच तिला सीपीआरमध्ये दाखल होण्याची विनंती केली. पहिले या महिलेने रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला मात्र नंतर पोलिसांनी तिची समजूत काढल्यानंतर अखेर त्या रुग्णालयात दाखल होण्यास तयार झाल्या. यानंतर पोलिसांनी या घटनेची माहिती त्या पीडित महिलेच्या कुटुंबीयांना दिली. तसेच पोलिसांनी पीडित विवाहितेच्या कुटुंबीयांना बोलावून त्यांचेसुद्धा समुपदेशन केले.