हिंगोली : हॅलो महाराष्ट्र – हिंगोलीमध्ये पती पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याच्या कारणातून हिंगोलीतील एका तरुणाने आपल्या पत्नीसोबत अमानुष कृत्य केलं आहे. या नराधम पतीने पीडितेला सिगरेटचे चटके दिले तसेच तिला अँटीसेप्टीक लिक्विडसुद्धा पाजले. यानंतर आरोपी पती आणि सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून 24 वर्षीय पीडित महिलेने मुंबईतील शिवडी पोलीस ठाण्यात पतीसह 9 जणांविरोधात फिर्याद दाखल केली. शिवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर हा गुन्हा हिंगोली पोलिसांकडे वर्ग केला. हिंगोली पोलिस पुढील तपास करत आहेत.
पती आकाश वाघमारे, बळीराम वाघमारे, राज टापरे, आदित्य वाघमारे, गंगाराम खिल्लारे, विजय खिल्लारे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत. यांच्यासोबत अन्य तिघांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोली शहरातील बावनखोली परिसरातील रहिवासी असणाऱ्या आकाश वाघमारे याने आपण शिक्षक असल्याची खोटी माहिती देऊन मुंबईतील शिवडी येथील रहिवासी असणाऱ्या तरुणीसोबत लग्न केले होते. लग्नानंतर काही दिवस चांगले गेल्याने पतीने आणि सासरच्या मंडळींनी पीडित महिलेचा छळ सुरु केला.
यादरम्यान आपला पती शिक्षक शिक्षक नसल्याचं देखील उघडकीस आलं. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर, पीडितेनं आपल्या नवऱ्याशी बोलणं बंद केलं. तसेच आरोपी पती लैंगिक संबंध ठेवण्यासाठी पीडितेवर दबाव आणू लागला. पीडितेनं लैंगिक संबंधासाठी नकार दिल्याच्या कारणातून आरोपी पतीने क्रूरतेचा कळस गाठला आहे. आरोपीने आपल्या पत्नीला सिगरेटचे चटके देत, तिला अँटीसेप्टीक लिक्विड पाजलं. यानंतर पती आणि सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून पीडित विवाहिता आपल्या माहेरी आली. इकडे आल्यानंतर तिने मुंबईतील शिवडी पोलीस ठाण्यात पतीसह एकूण नऊ जणांविरोधात फसवणूक आणि छळ केल्याची फिर्याद दाखल केली. हिंगोली पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.