पाटण | कोयना विभागातील नवजा या गावातील विवाहितेने दारूडया नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून स्वताला राहत्या घरी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्याची घटना घडली. या घटनेत सीमा रवींद्र जाधव (वय- 35) असे पेटवून मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नवऱ्यास कोयनानगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मृत विवाहिता सीमा हिच्यावर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार पार पडले.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी, रवींद्र भागुजी जाधव (वय- 42 रा. नवजा, ता. पाटण) याने आपली पत्नी सीमा हिला आईकडून दारूसाठी पैसे आण म्हणून वारंवार मारहाण शिवीगाळ करत होता. 31 ऑक्टोंबरला कोयनानगर येथे पत्नी सीमा हिच्याकडे दारूसाठी पैशाची मागणी केली. सीमाने याबाबत असमर्थता दर्शवल्याने पती रवींद्र जाधव याने तिला जबरदस्त मारहाण केली होती. यावेळी सीमा हिच्या आई समोर ही मारहाण करण्यात आली होती.
1 सप्टें रोजी सकाळी 10 वाजता सीमा जाधव हि स्वयपाक करताना चुलीत होरपळली असल्याचा फोन जावई रवींद्र जाधव याने सीमाची आई संगीता उत्तम कांबळे यांना केला. अत्यवस्थ असणारी सीमा उपचार सुरू असताना मरण पावली आहे. या मृत्यूला सीमाचा दारुडा नवरा हा जबाबदार असल्याचा आरोप सीमा हिची आई संगीता उत्तम कांबळे यांनी केला आहे.
नवजा या गावी आज मृत सीमा हिच्यावरअंत्यसंस्कार झाले आहेत. या वेळी मृत सीमाच्या माहेरच्या नातेवाईकांनी सीमाच्या नवऱ्याला चोप दिला. यामुळे सीमा हिच्यावर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार पार पडले आहेत. तपास सपोनी चंद्रकांत माळी करत आहेत.