हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यातील महिलांचे हित पाहून आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेत चौथे महिला धोरण तयार केले आहे. या धोरणामध्ये निमशासकीय व खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या महिलांना मातृत्व रजेची (Maternity leave) तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर, नव्या धोरणांमध्ये ज्येष्ठ महिलांना एसटीतून मोफत प्रवासाची सवलत देण्याचा विचार करण्यात येणार आहे. त्यामुळे याचा सर्वात जास्त फायदा महीला वर्गाला होईल.
महिलांचा विकास आणि त्यांच्या आरोग्याचा विचार करून शासनाकडून वेगवेगळी धोरणे अमलात आणली जाणार आहेत. या धोरणांमध्ये महिलांचे आरोग्य, पोषण, आहार, शिक्षण व कौशल्य विकासावर जास्त भर देण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर, महिला हिंसाचार रोखण्यासाठी विविध उपाय योजना राबवल्या जाणार आहेत. तसेच, लांबचा प्रवास करणाऱ्या महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारण्याच्या सूचना संबंधित विभाग आणि खाजगी रस्ते बांधणी विभागाला देण्यात येणार आहे.
याचबरोबर, शासनाच्या पाळणा घर योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी , महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी जलदगती न्यायालये स्थापन करण्यात येणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे, या धोरणांच्या अंमलबजावणी होत आहे की नाही हे पाहण्यासाठी समिती स्थापन केली जाणार आहे. ही समिती दर सहा महिन्याला धोरणांविषयी अहवाल सादर करेल. राज्य सरकार महिलांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून ही सर्व धोरणे राबवणार आहे.