हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| ज्येष्ठ अभिनेते आणि तृणमूल काँग्रेसचे (TMC) खासदार शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांनी पुन्हा एकदा आपल्या परखड वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत. मंगळवारी त्यांनी समान नागरी कायद्याचे (UCC) समर्थन करताना देशभर मांसाहारावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. “फक्त बीफच नाहीतर तर संपूर्ण मांसाहारावरच बंदी असायला हवी” असे शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हणले आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावर जोरदार टीका केली जात आहे.
गुजरातमध्ये UCC लागू करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. याविषयी माध्यमांशी संवाद साधताना सिन्हा म्हणाले की, “उत्तराखंडने समान नागरी कायदा लागू करून ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, तो निश्चितच स्तुत्य आहे. कोणत्याही देशात समान नागरी कायदा असायलाच हवा, कारण तो देशातील सर्व नागरिकांना समान नियमांच्या चौकटीत आणतो. मात्र, हा कायदा केवळ राजकीय हेतूंसाठी लागू करण्यात येत नाही, याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. विविध समाजघटकांच्या गरजा लक्षात घेऊन याची अंमलबजावणी करावी,”
मांसाहारबंदीची मागणी
त्याचबरोबर, “सरकारने अनेक ठिकाणी बीफवर बंदी घातली आहे, पण काही ठिकाणी ते अद्याप खुलेआम खाल्ले जात आहे. यावर संपूर्ण देशात एकसंध धोरण असायला हवे. काही ठिकाणी बंदी आणि काही ठिकाणी सूट हा भेदभाव योग्य नाही. मी तर म्हणतो, केवळ बीफ नाही, तर संपूर्ण मांसाहारावरच बंदी घालायला हवी,” असे सिन्हा यांनी म्हणले.
यासह, “उत्तर भारतात बीफबंदी पाळली जाते, पण पूर्वोत्तर राज्यांमध्ये अजूनही खुलेआम बीफ विकले जाते. असा दुहेरी दृष्टिकोन योग्य नाही. ‘नॉर्थ इंडियात मम्मी आणि नॉर्थ ईस्टमध्ये यम्मी’ ही नीति खपवून घेतली जाणार नाही,” असे वक्तव्य माध्यमांशी बोलताना शत्रुघ्न सिन्हा यांनी केले आहे.
दरम्यान, शत्रुघ्न सिन्हा यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. तर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
त्यामुळे देशभर मांसाहारबंदी शक्य आहे का, हा प्रश्न उपस्थित होत केला जात आहे.