आता 41 आजारांवरील औषध मिळणार स्वस्त दरात; भारत सरकारचा मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| भारतामध्ये महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे विविध आजारांवर मिळणारी औषधेही महागली आहेत. परिणामी या औषधांच्या वाढत्या किमतीमुळे सर्वच रुग्णांना ही औषधे घेणे परवडत नाहीयेत. त्यामुळेच यावर तोडगा काढण्यासाठी भारत सरकारने (Indian Government) मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून विविध आजारांवर 41 औषधे (Medicines) आणि 6 फॉर्म्युलेशनच्या (Formulation) किमती कमी करण्यात आल्या आहेत. यामध्ये, शुगर, हृदय, यकृत, अँटासिड, संसर्ग, ऍलर्जी, मल्टीविटामिन, अशा आजारांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नुकतीच नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अथॉरिटी ऑफ इंडियाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकींमध्येच एकूण 41 औषधांवरील किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, या बैठकीवेळी गॅझेट नोटीफिकेशन जारी करण्यात आली. महत्वाचे म्हणजे, NPPA ही एक सरकारी नियामक संस्था आहे. जी फार्मास्युटिकल औषधांच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी काम करते. या संस्थेच्या निर्णयामुळेच औषधांच्या किमतीत घट झाली आहे.

रुग्णांना मोठा दिलासा

आपल्या देशामध्ये विविध आजारांवरील रुग्णांची संख्या सर्वात जास्त आहे. हे रूग्ण कोणत्या ना कोणत्या आजारांमुळे त्रस्त आहेत. या रुग्णांच्या औषधोपचारांसाठी कुटुंबाकडून बक्कळ पैसा खर्च करण्यात येतो. अनेकवेळा तर काहीजण ही औषधे घेण्यासाठी आणि रुग्णाला योग्य उपचार सुविधा मिळावी यासाठी आयुष्यभरासाठी कमावलेला पैसा खर्च करतात. या सर्व बाबी विचारात घेऊनच NPPA ने औषधांवरील किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, भारतामध्ये दहा कोटीपेक्षा अधिक रुग्ण मधुमेहाचे आहेत. यातील अनेक रुग्ण हे दररोजच्या औषधांवर आणि इन्सुलिनवर अवलंबून आहेत. आता सरकारने या औषधांमध्ये घट केल्यामुळे मधुमेह असणाऱ्या रुग्णांना ही याचा मोठा दिलासा मिळाला आहे.