वडूज प्रतिनिधी | मिलिंदा पवार
माण – खटाव तालुक्यासाठी पिण्याचे पाणी व सिंचन व्यवस्थेसाठी असलेल्या जिहे-कठापूर उरमोडी, टेंभू तारळी, ब्रह्मपुरी आदि उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून खटाव माण मधील वंचित राहिलेल्या भागासाठी पाणी मिळावे यासाठी बैठकीचे आयोजन केले आहे. या प्रश्नावर सामुदायिक प्रयत्न करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक रविवारी दि. 24 रोजी दुपारी 3 वाजता सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली आहे.
आंधळी धरणातून उत्तर भागातील 32 गावांसाठी उरमोडी सिंचन योजनेद्वारे आठ महिने पाणी मिळावे. नेरमधून दरजाई, दरुज सातेवाडी, पेडगाव ,एनकूळ, कणसेवाडी या 15 गावासाठी पिण्याचे व सिंचनाचे पाणी मिळावे. तसेच टेंभू योजनेतून मायणी, कलेढोण, कान्हरवाडी, हिवरवाडी, पडळ आदी 16 गावांसाठी तसेच गारुडी, तरसवाडी, माण तालुक्यातील विरळी शेनवडी, वरकुटे मलवडी, कुकुडवाड, वडजल या 18 गावांना पाणी मिळावे.
या सोबत ब्रह्मपुरी उपसा सिंचन योजनेतून गोपुज ,औंध, पळशी, अंभेरी, कोकराळे आदी वंचित गावासाठी पाणी मिळावे. या सर्व गावाच्या बाबतीत सर्व पक्षीय विचारविनिमय बैठक केली जाणार आहे. त्यानंतर त्याबाबत पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. बैठकीस सर्व पक्ष यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी पत्रकाद्वारे केली आहे.