हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| महाराष्ट्र जलसंपदा विभागामार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या संदर्भातील नुकती जाहिरात जलसंपदा विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार, येत्या 24 नोव्हेंबर 2023 पर्यंत इच्छुक उमेदवारांना विविध पदांसाठी अर्ज करता येणार आहे. महाराष्ट्र जलसंपदा विभागात एकूण 4 हजार 497 पदे भरली जाणार आहे. या पदांसाठी तरुणांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल. या संदर्भातील सविस्तर माहिती पुढे देण्यात आली आहे.
महाराष्ट्र जलसंपदा विभाग तब्बल 4 हजार 497 पदांसाठी तरुणांची भरती करून घेत आहे. उद्यापासून म्हणजेच 3 नोव्हेंबरपासून या पदासाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. तसेच, पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 नोव्हेंबर 2023 असेल. इच्छुक उमेदवारांना wrd.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येईल. याठिकाणी तुम्हाला भरतीची जाहिरात देखील मिळेल. यामध्ये अर्ज प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
कोणत्या पदांसाठी भरती
एकूण 4 हजार 497 जागांमध्ये वैज्ञानिक सहाय्यक गट-ब (अराजपत्रित), निम्नश्रेणी लघुलेखक गट-ब (अराजपत्रित), कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-क), भूवैज्ञानिक सहाय्यक (गट-क), आरेखक (गट-क), सहाय्यक आरेखक (गट-क), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क), प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क), अनुरेखक (गट-क), दप्तर कारकुन (गट-क), मोजणीदार (गट-क), कालवा निरीक्षक (गट-क), सहाय्यक भांडारपाल (गट-क), कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक (गट-क) या सर्व पदांची भरती होणार आहे.
ऑनलाईन अर्ज शुल्क
येत्या 24 नोव्हेंबरपर्यंत इच्छुक तरुणांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यावेळी खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांकडून 1000 रूपये शुल्क आकारले जाईल. तर, मागासवर्गीय, आ.दू. घटक, अनाथ, दिव्यांग प्रवर्गाच्या उमेदवारांकडून 900 रुपये आकारण्यात येतील.