तीव्र कुपोषणामुळे मेळघाटात ३७ बालकांचा मृत्यू
मेळघाट| कुपोषणाची भयानकता दिवसेंदिवस वाढल्याने मेळघाटात मागील ३० दिवसांत ३७ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. आदिवासी भागातील बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी आरोग्य विभागातर्फे मुंबईत शनिवारी गाभा समितीची बैठक घेण्यात आली होती. मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील जुलै महिन्यातील आकडेवारी पाहिली असता शून्य ते सहा वर्षे वयोगटातील ३७ बालकांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.
राज्यात २१,००० हून अधिक बालके तीव्र कुपोषणाशी झुंज देत आहेत.
मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यांत एप्रिल ते जून या तीन महिन्यात ११४ बालकांचा मृत्यू झाला. गतवर्षीपेक्षा ही आकडेवारी जास्त असल्याची नोंद आहे. बालमृत्यूच्या संख्येत वाढ झाल्यानंतर ही बैठक पार पडल्याने प्रशासनाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. राज्यातील आदिवासी भागातील बालमृत्यू रोखण्यासाठी शासनाच्या विविध उपाययोजना अस्तित्वात असताना, मेळघाटात डॉक्टरांच्या रिक्त जागा कायम आहेत. नागपूर अधिवेशनापूर्वी आरोग्य विभागाचे संचालक मेळघाटात येऊनही याबाबत काही फायदा न झाल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.