जिंतूर प्रतिनिधी – सततच्या लाॅकडाऊनला कंटाळून परभणी जिल्ह्यातील एका व्यापार्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जिंतूर शहरात घडली आहे. राहत्या घरात गळफास घेऊन सदर व्यपार्याने आपले जीवन संपवले असल्याची माहिती मिळाली आहे. परभणी जिल्ह्यात सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत असलेने प्रशासनाने कडक संचारबंदी लागू केली आहे. यामुळे अनेकांच्या रोजगारावर गदा आली आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, जिंतूर शहरातील सटवाई मंदिर परिसरातील कापड व्यवसाय करणार्या एका व्यापार्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. नारायण सदाशिव डोईफोडे (वय 38) असे आत्महत्या केलेल्या व्यापार्याचे नाव आहे. सततच्या लॉकडाऊनमुळे व्यवसायामध्ये होणाऱ्या नुकसानाला कंटाळून ही आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. सदर व्यापारी ग्रामीण भागात जाऊन कापड व्यवसाय करत होता. त्यातून मिळणार्या उत्पन्नातून त्यांचा उदरनिर्वाह होत असे. मात्र, सततच्या लॉकडाऊनमुळे व्यवसाय करणे अवघड झाले होते. लॉकडाऊनसह संचारबंदीमुळे यावर्षीही व्यवसाय होत नसल्याने ते त्रस्त होते. यातच बँकेकडून घेतलेले कर्ज कसे फेडावे या विवंचनेतून त्यांनी राहत्या घरी छताला दोरी लावून गळफास घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान, त्यांच्या नातेवाईकांनी आर्थिक मदत देण्याची मागणी केली असून जोपर्यंत मदत मिळत नाही, तोपर्यत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची त्यांनी भूमिका घेतली होती. मात्र, पोलिसांसह महसूल प्रशासनाच्या आश्वासनानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page
Click Here to Join Our WhatsApp Group