त्रास होईल अशी लॉकडाऊनची भूमिका खपवून घेणार नाही : प्रवीण दरेकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागलेला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत चालली आहे. अशात राज्यशासनाकडून राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनचे संकेत दिले जात आहेत. अशावेळी ” महाराष्ट्र थांबला नाही थांबणार नाही” असा घोषणा दिल्या जातात, कोरोनाच्या बाबतीत ही घोषणा लागू आहे का ? राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं असताना पुनः टाळेबंदी करून सर्वसामान्य लोकांचे हाल होण्याची सरकार वाट पाहत आहे का? असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला विचारलाय. दरेकर यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकावर जोरदार निशाणा साधला.

 

 

लॉकडाउनच्या संदर्भात पक्षाची भूमिका स्पष्ट असल्याचं दरेकरांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले, सरकारला लॉकडाऊन लावायचाच असेल तर अगोदर सर्व क्षेत्रातील कष्टकऱ्यांच्या खात्यात, परीक्षा देणारे तरुण, छोटा व्यावसायिक, कष्टकरी, संघटित व असंघटित कामगारांच्या खात्यात 5 हजार रुपये जमा करा आणि मगच टाळेबंदी लावा, अशी मागणी दरेकरांनी केलीय. महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता वाऱ्यावर पडल्याचं पाहायला मिळतं. देशाच्या तुलनेत राज्याचा ढिसाळ कारभार सुरु आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरलं आहे. याला सर्वस्वी मुख्यमंत्री आणि राज्यसरकार जबाबदार असल्याचा आरोपही दरेकरांनी केलाय. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा खेळ सुरू आहे. वर्षभरात आलेले अपयश लपवण्यासाठी लॉकडाउन लावण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. परंतु, सर्वसामान्यांना त्रास होईल अशी कोणतीही भूमिका भाजप खपवून घेणार नाही, असा इशाराच दरेकरांनी दिला आहे.

केंद्र सरकारने कोरोना काळात अनेक उपाययोजना केल्या, सर्वसामान्यांना मदत केली. त्यामुळेच देश पातळीवर केंद्र सरकार कोरोना रोखण्यात यशस्वी ठरल्याचा दावा दरेकरांनी केला आहे. केंद्र सरकारने राज्याला सर्वतोपरी मदत केल्यानंतरही महाविकास आघाडी सरकार नियोजन करण्यात अपयशी ठरलं आहे. केंद्राने राज्याला दिलेल्या व्हेंटिलेटरपैकी 400 व्हेंटिलेटर प्रशिक्षित तंत्रज्ञ नाहीत म्हणून धूळ खात पडून आहेत. राज्यातील सरकार जनतेच्या जीविताच रक्षण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाला, गृह विभागाला आमची विनंती आहे की, त्यांनी राज्यात लक्ष घालावे आणि कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही दरेकरांनी यावेळी केलीय.

 

Leave a Comment