म्हसवडच्या सिध्दनाथाची रथयात्रा रद्द : RT-PCR, लसीकरण कागदपत्रे तपासली जाणार

बाहेर गावच्या सासनकाठ्यांना प्रवेशबंदी

म्हसवड | राज्यासह राज्याबाहेरील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या म्हसवड येथील सिद्धनाथ व माता जोगेश्वरीची येत्या रविवारी दि. 5 डिसेंबर रोजी होणारी रथयात्रा प्रशासनाने अखेर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बॅरिकेंटिंग केलेल्या रथाचे लांबूनच भाविकांना दर्शन घेता येणार असून केवळ लसीकरण झालेल्या भाविकांनाच प्रवेश मिळणार आहे. गुरुवारी प्रांताधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. बाहेर गावावरून येणाऱ्या सासनकाठ्यांनाही बंदी घालण्यात आली आहे.

या बैठकीस उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नीलेश देशमुख, तहसीलदार सूर्यकांत येवले, सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे यांच्यासह तालुक्यातील सर्व विभागाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. माण खटाव मधील यात्रा बाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सातारा यांच्यासोबत झालेल्या बैठकीतील निर्देश सूचनाबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली. यात्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या गावाबाहेरून सहभागी होऊ इच्छिणाऱ्या गावाबाहेरून दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांचे संपूर्ण लसीकरण होणे आवश्यक असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले

गावाबाहेरून येणाऱ्या वैयक्तिक भाविकांच्या लसीकरण कागदपत्र तपासणी आरोग्य विभागाने शिक्षण महसूल नगरपालिका व इतर विभागाच्या मदतीने करून पात्र व्यक्तींची आरटीपीसीआर तपासणी करून पात्र व्यक्तींना रांगेने दर्शनासाठी सोडावे असे सर्वसंमतीने ठरले. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून धार्मिक विधी संबंधित व्यक्ती देवस्थान ट्रस्टकडून करण्यास परवानगी देण्यात आली. रथमिरवणुकीस परवानगी नाकारण्यात आली असून रथ हा यात्रा पटांगणात स्थिर राहील. त्यांच्याभोवती डबल बॅरेकेटींग करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोरोनाच्या सर्व नियमांचे व शासनाच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे सूचनांचे पालन करतील त्याच भाविकांना दर्शनास परवानगी देण्यात आली आहे. कोणत्याही सामूहिक स्वरूपाची कृती करता येणार नाही. मंदिरातील श्रींची मूर्ती व रथावरील पवित्र वस्तू व रथाचे दर्शन बॅरेकेटिंग च्या बाहेरून घेता येणार असून श्रींची मूर्ती पालखी रथ व सर्व इतर वस्तूंना स्पर्श करण्यास मनाई करण्यात आली आहे. तात्पुरती दुकाने व मनोरंजनाची साधने फेरीवाले हातगाड्या यांना परवानगी नाकारण्यात आली असून वाहनांच्या पार्किंग वाहतूक व व्यवस्थापन पोलीस विभागाला आवश्यक ते निर्बंध लावण्याच्या सूचना देण्यात आल्या.

You might also like