Wednesday, June 7, 2023

श्रमिकांच्या घरवापसीसाठी पुणे विभागातून उद्या एकाच दिवशी ७ ट्रेन रवाना होणार

पुणे । लॉकडाऊनमुळे विविध राज्यांमधून मजुरांनी आपापल्या गावची वाट धरली असून पुण्यातून उद्या एकाच दिवशी सात श्रमिक विशेष गाड्या रवाना होणार आहेत. जिल्हा प्रशासनाने या गाड्यांपर्यंत मजुरांना आणण्याची चोख व्यवस्था केली आहे. लॉकडाऊनमुळे पुणे विभागातील ५ जिल्ह्यांमध्ये अडकलेल्या ३५ हजार १६३ श्रमिकांना २८ रेल्वे गाड्यांतून आपापल्या मूळ गावी पाठविण्यात आले आहे. शुक्रवारी (दि. १५) आणखी ७ रेल्वे गाड्या सोडण्यात येणार असून, त्यामधून ९ हजार ३६८ श्रमिकांची पाठवणी केली जाणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज सांगितले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ.म्हैसेकर यांनी ही माहिती दिली.यावेळी बैठकीत महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पोलिस आयुक्त के. व्यंकटेशन उपस्थित होते.

श्रमिकांना मूळ गावी पाठविण्यासाठी रेल्वे आणि बसेसची व्यवस्था करण्यात येत आहे. आतापर्यंत पाठविण्यात आलेल्या २८ रेल्वे गाड्यांमध्ये पुण्यातून १३, सातारा येथून ४, सांगलीतून ३, कोल्हापूरमधून ६ आणि सोलापूर येथून २ गाड्या गेल्या असल्याचे म्हैसेकर यांनी सांगितलं. तर येत्या शनिवारी सुद्धा ७ श्रमिक विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था केली जाणार आहे. पुण्यातून ४ आणि कोल्हापूर येथून ३ रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यामधून सुमारे ९ हजार ३६८ श्रमिक मूळ गावी जाणार आहेत अशी माहिती म्हैसेकर यांनी दिली.

श्रमिकांना रेल्वेशिवाय बसेसनेही गावी पाठविण्यात येत आहे. जवळच्या राज्यांतील श्रमिकांसाठी बसेसची व्यवस्था करण्यात येत आहे. आतापर्यंत १ हजार ४३ बसेसमार्फत १७ हजार २९० श्रमिकांना पाठविण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे राज्याबाहेर किंवा अन्य जिल्ह्यांमध्ये अडकलेले श्रमिक हे मूळ गावी येत आहेत. आजवर १७० बसेसमधून प्रामुख्याने पुणे, सातारा आणि सांगलीमध्ये तीन हजर ४३९ श्रमिक आले आहेत असंही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”