कराड | कराड ते चांदोली मार्गावर येळगाव फाटा येथे दीड वर्षाच्या चिमुकलीला कडेवर घेऊन रस्ता ओलांडणाऱ्या आईला कारने जोराची धडक दिली. या धडकेत चिमुकली दूरवर फेकली गेली. तर तिच्या आईचा दुर्दैवी मृत्यू झाला. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा भिषण अपघात झाला. या अपघातप्रकरणी अज्ञात कार चालकावर कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. काजल सुशांत बांदेकर (वय- 25) असे अपघातात ठार झालेल्या विवाहीतेचे नाव आहे. तर आर्या सुशांत बांदेकर ही चिमुकली या अपघातातून सुदैवाने बचावली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येवती येथील गणेश नांगरे हा मुंबईमध्ये राहण्यास आहे. तसेच त्याची बहीण काजल बांदेकर हीसुद्धा मुंबईत राहते. नातेवाईकांचा विवाह असल्यामुळे गणेश, त्याची बहीण काजल व दीड वर्षांची आर्या हे तिघेजण सोमवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ट्रॅव्हल्सने येळगाव फाटा येथे पोहोचले. ट्रॅव्हल्समधून उतरून ते रस्ता ओलांडत होते. त्यावेळी काजलच्या कडेवर तिची लहान मुलगी आर्या होती. रस्ता ओलांडत असताना कऱ्हाड बाजूकडे निघालेल्या एका कारने काजलला जोराची धडक दिली. त्यावेळी आर्या दूरवर फेकली गेली. तसेच काजल हवेत उडून रस्त्यावर कोसळली.
या अपघातात काजलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रक्त येऊन ती जागेवरच बेशुद्ध झाली. अचानक घडलेल्या या घटनेनंतर घाबरलेल्या गणेशने तातडीने आर्याला उचलले. सुदैवाने ती सुखरूप होती. मात्र काजल बेशुद्ध पडल्यामुळे त्याने तातडीने त्याचे मोबाईलवरुन नातेवाईक विनोद हिनुकले यांना माहिती दिली. त्यांच्यासह इतर नातेवाईक तातडीने त्याठिकाणी आले. त्यांनी काजलला उंडाळेच्या रुग्णालयात दाखल केले. तेथून अधिक उपचारासाठी तिला कराडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याठिकाणी उपचार सुरू असताना दुपारी काजलचा मृत्यू झाला. अपघाताची नोंद कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.




