नवी दिल्ली वृत्तसंस्था: भारताचे महान धावपटू मिल्खासिंग यांच्या पत्नी निर्मल मिलखा सिंग यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्या 85 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते मात्र उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिलखा सिंह यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याने ते अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकले नाहीत. करोना प्रोटोकॉल अंतर्गत निर्मल सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यानं निर्मल सिंह यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 26 मे रोजी त्यांना मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात भरती करण्यात आले. 30 मे रोजी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सामान्य कक्षातून आई सी यु वॉर्डमध्ये हलवण्यात आलं होतं. मात्र त्यातही त्यांची ऑक्सिजन लेवल झपाट्याने कमी होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर डॉक्टरांनी अथक प्रयत्न केल्यानंतर ही त्यांचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले. निर्मल सिंह या पंजाब सरकारच्या खेल मार्गदर्शक आणि भारतीय महिला राष्ट्रीय व्हॉलीबॉल संघाच्या माजी कर्णधार होत्या. सध्या मिल्खा सिंग यांच्यावर देखील उपचार सुरू असून मिल्खा सिंग यांना ताप आणि श्वास घेण्यास त्रास होत होता त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे.