सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
सांगली शहरातील गणपती पेठ आणि माधवनगर येथील दुकानांना मध्यरात्रीच्या सुमारास आग लागल्याने लाखो रुपयांचे साहित्य जळाले. गणपती पेठेत रात्री अडीचच्या सुमारास रंगाच्या दुकानाला आग लागली. या आगीत रंग आणि साहित्य खाक झाले. तर जुनी इमारत असल्याने लाकडी साहित्य सकाळ पर्यंत जळत होते. माधवनगर येथे चप्पलच्या गोदामाला रात्री शॉर्ट सर्किटने आग लागली. यात गोदाम जळुन खाक झाले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच धाव घेऊन आग आटोक्यात आणली. माधवनगर येथील रविवार पेठ मध्ये भारत कार्पोरेशन सेल्स या नावाने पॅरागॉन चप्पल कंपनीचे गोडाऊन आहे. सदरच्या गोडाऊनला पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन भीषण आग लागली. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी विजय पवार यांच्यासह महानगरपालिकेचे तीन बंब तात्काळ दाखल झाले. एकूण चार बंबाच्या साहाय्याने दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
दुसरीकडे पाऊणे तीन वाजण्याच्या सुमारास गणपती पेठेतील रंगाच्या दुकानाला आग लागली. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाच्या समोर असणाऱ्या विष्णू श्रीधर साने यांच्या कलरच्या दुकानाला पहाटे पाऊणे तीन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. रंगांमध्ये केमिकल असल्याने छोटे छोटे स्फोट होत होते. त्यामुळे आग नियंत्रण आणण्यात वेळ लागत होता. तरीही तब्बल पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.