शहरातील कोवीड सेंटरमधील लाखोंचे साहित्य गायब

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – कोरोना संकटात रुग्णांचा आधार ठरलेल्या कोविड सेंटरमधील लाखो रुपयांचे साहित्य अचानक गायब झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत महापालिकेने शहरात कोविड सेंटर्स सुरु केले होते. शासनाच्या निधीतून यात लाखो रुपयांचे साहित्यही खरेदी करण्यात आले होते. सध्या काही महिन्यांपासून रुग्णसंख्या घटल्याने हे कोविड सेंटर्स बंद करण्यात आले आहेत. मात्र यातील साहित्यच गायब झाल्याची माहिती उघड झाली आहे. महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांन गुरुवारी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांना दिले आहेत. तसेच गायब साहित्याची रिकव्हरी न झाल्यास त्याची जबाबदारीदेखील अधिकाऱ्यांचीच राहील, असेही बजावले आहे.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत महापालिकेने रुग्णांवर उपचारासाठी 25 पेक्षा जास्त क्वारंटाइन आणि कोविड सेंटर्स सुरु केले होते. या सेंटरवर सर्व सुविधा पुरवण्यासाठी पलंग, बेडशीटपासून गाद्या, उशा, पिलो कव्हर, पंखे, फ्रिज, टीव्ही, खेळाचे साहित्य यासह दैनंदिन वापराच्या वस्तूंची लाखो रुपयांची खरेदी करण्यात आली होती. आता मात्र हे सेंटर्स ओस पडले आहेत. या सेंटर्समधील सर्व साहित्य गायब झाल्याचे आता लक्षात आले आहे.

कोविड सेंटर आणि क्वारंटाइन सेंटरवर नियुक्त कर्मचाऱ्यांवरच साहित्याची जबाबदारी होती. त्यामुळे 25 केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची चौकशी होणार आहे. पहिली लाट ओसरल्यानंतरही कोविड सेंटर्समधील साहित्य गायब झाले होते. त्याची चौकशी कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांच्याकडे दिली होती. त्यावेळी साहित्याची रिकव्हरी झाली. मात्र जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली नाही. आता तिसऱ्या लाटेनंतर लाखो रुपयांचे साहित्य लंपास झाल्याचे उघड झाले आहे. यावेळी मात्र संबंधित कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित होऊन त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.