औरंगाबाद । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बकरी ईद साध्या पद्धतीने आणि प्रतिकात्मक साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. बकरी ईद प्रतिकात्मक साजरी करायची आहे तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ५ ऑगस्ट रोजी होणारं राम मंदिराचं भूमिपूजन प्रतिकात्मकरित्या साजरं करावं, सर्व नियम आम्हालाच का? असा सवाल खासदार इम्तियाज जलील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.
जलील यांच्या या वक्तव्याला विश्व हिंदू परिषदेने जोरदार आक्षेप घेतला आहे. जलील यांचं विधान सामाजिक तेढ निर्माण करणारं आणि बेजबाबदारपणाचं आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विहिंपने केली आहे. त्यामुळे बकरी ईदच्या मुद्द्यावरून एमआयएम आणि विहिंपमध्ये जुंपण्याची शक्यता आहे. याशिवाय, इम्तियाज जलील ( imtiaz jaleel) यांनी बकरे खरेदीच्या ऑनलाइन प्रक्रियेला विरोध केला आहे. श्रीमंतांकडे स्मार्ट फोन आहेत. ते लोक ऑनलाइन पद्धतीने बकऱ्यांची खरेदी विक्री करू शकतात. पण खेड्यापाड्यातील गरीब शेतकऱ्यांनी काय करायचे?, असा सवाल जलील यांनी केला आहे.
बकरी ईदनिमित्त औरंगाबादमध्ये मार्गदर्शक सूचना जारी
औरंगाबादचे महापालिका प्रशासक पांडेय यांनी बकरी ईदनिमित्त मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. करोनाच्या आजारामुळे सगळीकडे संसर्गजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्याच्या स्थितीत राज्यात सगळ्या धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे नागरिकांनी बकरी ईदची नमाज घरीच अदा करावी. मशीद, ईदगाह किंवा सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करू नये. प्रतिबंधित क्षेत्रात सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील. त्यात कोणत्याही प्रकारची शिथिलता दिली जाणार नाही. जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करायची असल्यास त्यांनी ऑनलाइन पद्धतीने किंवा दूरध्वनीवरून जनावरांची खरेदी करावी. नागरिकांची शक्यतो प्रातिकात्मक कुर्बानी करावी. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, महापालिका, स्थानिक प्रशासन व पोलिसांनी जाहीर केलेल्या नियमांचे पालन बंधनकारक असेल, असे मार्गदर्शक सूचनांत म्हटले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”