औरंगाबाद । कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळं लॉकडाउन जाहीर करण्यात आल्यापासूनच राज्यातील खबरदारी म्हणून सर्व धर्मीक प्रार्थनास्थळं बंद आहेत. दरम्यान, राज्यात अनलॉक होत असताना इतर गोष्टींवरील निर्बंध हटविले असताना प्रार्थनास्थळं पुन्हा उघडण्याची मागणी राजकीय स्तरातून जोर धरत आहे. दरम्यान, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सरकारने विरोध केला तरी २ सप्टेंबरपासून राज्यातील मशिदी उघडणार असल्याचं म्हटलं आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.
“आम्ही आमच्या वतीने अल्टिमेटम देत आहोत. १ तारखेला गणपती विसर्जन आहे. हिंदू बांधवांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. १ तारखेपासून सगळी मंदिरं उघडा आणि २ तारखेपासून आम्ही आमच्या सगळ्या मशिदी उघडणार. काही योग्य तर्क असतील तर ऐकू अन्यथा परवानगी दिली नाही तरी २ तारखेपासून सर्व मशिदी उघडू हे सरकारमधील लोकांना मला सांगायचं आहे,” असं आव्हानच इम्तियाज जलील यांनी दिलं आहे. यावेळी त्यांनी याची सुरुवात आपणच औरंगाबादमधून करणार असल्याचंही सांगितलं.
दरम्यान, सर्व धार्मिक स्थळे खुली करावीत अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. रामदास आठवले यांनी या मागणीचे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही धार्मिक प्रार्थनास्थळं खुली करण्याचा आग्रह धरला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”