संभाजी ब्रिगेड निवेदनातून नाराजी व्यक्त करेल वाटलेलं; शाईफेकीवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठी साहित्य संमेलन स्थळी पाहणी करण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्याची घटना आज घडली. या घटनेनंतर विविध राजकीय व्यक्तींकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. याबाबत राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संभाजी ब्रिगेड आपली नाराजी निवेदन देऊन व्यक्त करतील असं मला वाटले होते. पण त्यांनी शाईफेक केली, असे भुजबळ म्हणाले.

संमेलनात घडलेल्या प्रकारानंतर मंत्री भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, गिरीश कुबेर यांनी गोल्फकार्ट मधून संमेलन स्थळ पाहणी केली, असा काहीतरी प्रकार घडेल अशी सकाळपासून कुणकुण होती. संभाजी ब्रिगेडशी काही तरी कॉन्ट्रोव्हर्सी आहे. याचाही अंदाज होता.

मी आणि माझा मुलगा पंकज भुजबळ स्वतः त्यांना घेऊन फिरलो. पुण्यातून 2 जण मोटरसायकलवर आले होते, त्यांनी काळी पावडर कुबेर यांच्या अंगावर फेकली. व्यासपीठा जवळील प्रवेशद्वाराजवळ वाहन स्लो झाले त्यावेळी हा प्रकार घडला. शाईफेक करणाऱ्या दोन संशयीतांना ताब्यात घेण्यात आले आहे. या शाईफेकीच्या प्रकारानंतर साहित्य संमेलनस्थळी सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे, असे भुजबळ म्हणाले.