गृहराज्यमंत्री.. स्वतःचा जिल्हा सांभाळता येत नसेल तर राज्य कसं सांभाळणार ? : चित्रा वाघ

सातारा | जिल्ह्यातील पळसवेड गावच्या माजी सरपंचाने गर्भवती वनरक्षक महिला कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याच्या घटनेचा सर्वत्र निषेध केला जात आहे. भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ या आक्रमक झालेल्या असून ट्विट करत त्यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर निशाणा साधला आहे.

विनविभागातील महिला वनरक्षक सिंधू सानप यांना मारहाण करणारा माजी सरपंच रामचंद्र जानकर व त्याच्या पत्नीला सातारा पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेबाबत वाघ यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. ‘साता-यात पळसवडेचे माजी सरपंच रामचंद्र जानकर यानं गर्भवती वनरक्षक महिलेला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आहे. अशा नामर्द आणि माजोरड्या वृत्तीला वेळीच चिरडलं पाहिजे,’ असा संताप वाघ यांनी व्यक्त केला आहे.

माजी सरपंचाकडून गर्भवती वनरक्षक महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाणही घटना सातारा जिल्ह्यातील असल्याने चित्रा वाघ यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘शंभुराज देसाई, तुम्ही गृहराज्यमंत्री.. तुम्हालाच स्वतःचा जिल्हा सांभाळता येत नसेल तर राज्य कसं सांभाळणार, असा सवाल त्यांनी केला आहे. वनरक्षक सिंधू सानप यांच्या तक्रारीनंतर जानकर व त्यांच्या पत्नी प्रतिभा जानकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी बुधवारी दोघांनाही अटक केली आहे.