हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु अनेक ठिकाणी पंचनामे होऊन देखील आर्थिक मदत पोहोचवण्यात आलेली नाही. तसेच, राज्यावर आस्मानी संकट कोसळले असताना एकनाथ शिंदे तेलंगणाला प्रचारासाठी गेले आहेत. यावरूनच आज उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला आता मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे की, “उद्धव ठाकरेंच्या काळातही संकट आली, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. पण एनडीआरएफच्या दुप्पट मदत द्यायची, दोन हेक्टचा तीन हक्टर करण्याचा निर्णय घेतला. हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. आता स्वत: मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत, अजितदादाही लक्ष ठेऊन आहेत.” त्याचबरोबर, “ज्यांची अवस्था सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी अवस्था उद्धव ठाकरे यांची झाली आहे” असा टोला देसाई यांनी ठाकरेंना लगावला.
पुढे बोलताना, “शेजारच्या राज्यातील नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना येण्यासाठी विनंती केली. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे एका दिवसासाठी तिथे गेले आहेत. परंतु उद्धव ठाकरेंना मला विचारायचं आहे की तुम्ही मुख्यमंत्री असताना कोकणात अतिवृष्टी झाली होती, मोठे नुकसान झाले होते त्यावेळी तुमचे मंत्रीच अगोदर तिथे गेले होते. तुम्ही का गेला नाहीत, त्यावेळीं अतिवृष्टी झाली आणि तुम्ही लगेच तिथे गेलात अस नाही झाले” अशा शब्दात देसाई यांनी ठाकरेंवर पलटवार केला.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजप नेत्याच्या प्रचारासाठी राजस्थानला गेले होते. त्यानंतर आता राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडला असताना पुन्हा एकनाथ शिंदे तेलंगणाला प्रचारासाठी गेले आहेत. यावरुनच आज उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला. त्याचबरोबर , “आस्मानी संकट कोसळलेले असताना स्वत:ला गरीब शेतकऱ्यांचा मुलगा म्हणणारे मुख्यमंत्री तेलंगणा राज्यात निवडणुकांच्या प्रचाराला गेले आहेत. त्यांना अशी परिस्थिती असताना आपले राज्य सोडून दुसऱ्या राज्यात जायला लाज नाही वाटत”अशी जोरदार टीका एकनाथ शिंदेंवर उद्धव ठाकरेंनी केली.