व्यावसायिक अभ्यासक्रमांची अंतिम परीक्षाही ऐच्छिक – उदय सामंत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । विद्यापीठांच्या अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षांप्रमाणेच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा ऐच्छिक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. तर बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांबाबत कुलगुरु आणि अधिकारी यांची सरकारस्तरावर बैठक घेऊन दोन-तीन दिवसांत निर्णय घेण्यात येणार आहे, असे सामंत यांनी सांगितले.

राज्यातील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. मात्र राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी परीक्षा रद्द करता येणार नाहीत असं जाहीर केलं होतं. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. त्यात अंतिम वर्षाची परीक्षा ऐच्छिक असा निर्णय घेण्यात आला. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री फेसबुक लाइव्हद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देणार आली.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी फेसबुक लाईव्हमध्ये परीक्षेबाबत सांगितलेले मुद्दे पुढीलप्रमाणे

  • मागील सर्व सत्रात उत्तीर्ण झालेल्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना अंतिम परीक्षा न देता पदवी प्रमाण पत्र हवे असल्यास तसे त्यांच्याकडून लेखी स्वरुपात लिहून घेऊन विद्यापीठाने योग्य ते सूत्र वापरून त्यांचे निकाल घोषित करावेत. मागील सर्व सत्रात उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची इच्छा असेल तर तसे त्यांच्याकडून लिहून घेऊन परीक्षेला बसण्याची संधी देण्यात यावी. या विद्यार्थ्यांची परीक्षा कधी घ्यावी याचा निर्णय स्थानिक पातळीवर कोरोनाची परिस्थिती काय आहे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून विद्यापीठाने निर्णय घ्यावा व त्यानुसार वेळापत्रक जाहीर करावे.
  • ज्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा बॅकलॉग शिल्लक आहे त्यांच्या बॅकलॉगच्या विषयांच्या परीक्षांसदर्भात विद्यापीठांचे कुलगुरु आणि संबंधित अधिकारी यांची सरकारी स्तरावर बैठक घेऊन विचार विनिमय करून निर्णय घेण्यात येईल.
  • व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजे इंजिनिअरिंग, फार्मसी, हॉटेल व्यवस्थापन, व्यवस्थापन, वास्तुकला, संगणक शास्त्र, विधी, शारीरिक शास्त्र, अद्यापन शास्त्र या अभ्यासक्रमांच्या परीक्षा कोविडच्या परिस्थितीमुळे घेता येणार नाहीत. या विद्यार्थ्यांना अव्यावसायिक अभ्यासक्रमांप्रमाणेच पदवी परीक्षा ऐच्छिक असेल. अव्यावसायिक अभ्यासक्रमांप्रमाणेच व्यावसायिक अभ्यासक्रमांबाबत निर्णय घेण्यात येईल.
  • व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेता येणार नाहीत. पण सरकारच्या या निर्णयाला त्या अभ्यासक्रमांच्या शिखर संस्थांची मान्यता आवश्यक आहे. तशी मान्यता द्यावी म्हणून राज्य सरकार संबंधित शिखर संस्थांना विनंती करणार आहे.
  • मुख्यमंत्र्यांनी अंतिम वर्षाच्या अंतिम परीक्षेबाबत निर्णय जाहीर केला होता. राज्यपालांनी पत्र लिहिलं होतं म्हणून संभ्रमाचं वातावरण होतं. तो संभ्रम दूर करण्यासाठी आपत्कालिन व्यवस्थापन समितीची बैठक झाली.
  • मागील सर्व सत्रात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेत सरासरी गुण काढून पदवी प्रदान केली जाईल. कुणाला मार्क्स कमी असतील, त्यांना परीक्षा द्यायची असेल तर त्यांनी तसे लिहून द्यावे. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून परीक्षा घ्यावी. कोविडच्या परिस्थितीचा विचार करून विद्यापीठाने परीक्षेचा निर्णय घ्यावा, असे बैठकीत ठरविण्यात आले. तसा शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”