कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
अण्णासाहेब पाटील अर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा माथाडी कामगार नेते व माजी आ. नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. त्याबाबतचे पत्र आज शासनाने काढले आहे. मराठा समाजातील मुलांना व्यावसायिक कर्ज मिळावे, यासाठी नरेंद्र पाटील यांचे मोठे योगदान आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांना पदावरून हटविण्यात आले होते. त्यानंतर हे पद रिक्त होते. आता भाजप- शिंदे सरकारने आज नियुक्ती केल्याचे जाहीर केले. माजी आ. नरेंद्र पाटील यांना मंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे.
पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील असलेले नरेंद्र पाटील यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी नेहमीच जवळीक असलेली पहायला मिळाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतरही नरेंद्र पाटील यांनी मराठा आरक्षणावरून परखड भूमिका घेतली होती. मराठा समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर अनेकदा टीकाही केली. तसेच त्यांना पदावरून हटविण्याचीही मागणी केली. या मागणीनंतर अवघ्या आठवडाभरात नरेंद्र पाटील यांना अण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदावरून हटविण्यात आले होते. त्यानंतर ते भाजपमध्ये सक्रिय दिसून आले.
माजी आ. नरेंद्र पाटील याच्या काळात महामंडळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर तरूणांना व्यावसायिक कर्जे देण्यात आली. तसेच मराठा समाजाच्या अडी- अडचणी समजून घेण्यासाठी अनेक दाैरेही केले होते. त्यांनी केलेल्या कामामुळे शेकडो युवकांना रोजगार मिळाले होते. परंतु त्यांना पदावरून हटविल्यानंतर महामंडळाच्या काम ठप्प झाले होते. माजी आ. नरेंद्र पाटील यांच्या निवडीनंतर कराड- पाटण येथील कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.