कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज पाटील
अल्पसंख्याक तरूणांना रोजगार स्वयंरोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळास अधिक आर्थिक तरतूद करावी. अशी शिफारस महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाने शासनास करणार असल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांनी दिली. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांनी आज शासकीय विश्रामगृहामध्ये अल्पसंख्याक समाजातील तसेच शिष्टमंडळाच्या भेटी घेवून त्यांच्या समस्यांचे निराकारण केले, तसेच जिल्ह्यातील अल्पसंख्याक व इतर शिक्षकांच्या समस्यांबाबत चर्चा केली, निवेदने स्वीकारली यानंतर ते बोलत होते. अल्पसंख्याक समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी, यासाठी मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ अधिक सक्षम करावे यासाठी शासनाने या महामंडळाला 1 हजार कोटीची तरतूद करावी, अशी शिफारस आयोगाच्या माध्यमातून शासनास करण्यात अली असल्याचे त्यांनी सांगितले.
यासोबतच अल्पसंख्याक लोकसमुहांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा सर्वसमावेशक उत्कर्षासाठी तसेच अल्पसंख्यांकांच्या हक्काचे संरक्षण करण्यावर आयोगाचे बारीक लक्ष असल्याचेही अभ्यंकर यांनी यावेळी स्पष्ट केले. याबरोबरच अल्पसंख्यांकासाठीच्या 15 कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतही आयोगाने विशेष लक्ष केंद्रीत केले असल्याचेही ते म्हणाले.
अल्पसंख्याक समाजातील लोकांना घटनेने दिलेले संरक्षण आणि सुरक्षा याबाबत काळजी घेण्याबरोबरच त्यांना देय असणाऱ्या सवलतींचा लाभ योग्यरित्या मिळतो आहे किंवा नाही यावरही आयोगाचे कटाक्षाने लक्ष असल्याचे सांगून अध्यक्ष अभ्यंकर म्हणाले, शासनाच्या विविध विभागाशी संबंधित अल्पसंख्याकांच्या असणाऱ्या अडचणी, समस्यांबाबतही आयोग दक्ष असून याबाबत तक्रार अर्ज आल्यास आवश्यक ती कारवाई केली जात असल्याचे ते म्हणाले. अल्पसंख्यांक विशेषत: मुस्लिम आणि बौध्द समाजाच्या मुलभूत प्रश्नांबाबतही आयोग अधिक दक्ष आहे.
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांना जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजातील व्यक्ती आणि संघटनांच्या शिष्टमंडळाने भेट घेवून विविध मागण्या केल्या. या मागण्यांबाबत योग्य तो अहवाल शासनास केला जाईल, असेही ते म्हणाले. यावेळी जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजासाठी असणाऱ्या 15 कलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबतही संबंधितांशी त्यांनी चर्चा केली. त्यांच्यासोबत अल्पसंख्याक समाजातील विविध मान्यवर, विविध विभागांचे शासकीय अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.