हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mithun Chakraborty) हिंदी कलाविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. अचानक प्रकृती अस्वास्थ्यामुळे लाडके अभिनेते मिथुन यांना कोलकातामधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार, मिथुन यांच्या छातीत अचानक वेदना सुरु झाल्या आणि अस्वस्थता निर्माण झाल्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती यांना आज सकाळी अचानक छातीत दुखू लागले आणि अस्वस्थ वाटू लागले. आणखी तब्येत खालावण्याआधी त्यांना शनिवारी, १० फेब्रुवारी २०२४ रोजी त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिथुन यांचे वय ७३ वर्षे असून प्रकृती बिघाडामुळे त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांच्या निदर्शनाखाली उपचार सुरु आहेत. (Mithun Chakraborty) मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रकृती संदर्भातील ही माहिती समोर आल्यानंतर त्यांचे चाहते चिंता व्यक्त करू लागले आहेत. मात्र, अद्याप त्यांच्या तब्येतीबाबत कुटुंबाकडून किंवा रुग्णालयाकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
चाहत्यांच्या चिंतेत वाढ
अभिनेते मिथून चक्रवर्ती यांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे. मात्र, मिथून यांच्या कुटुंबातील कोणीही यावर भाष्य केलेले नाही वा त्यांच्या प्रकृतीविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे मिथुन यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण वाढताना दिसत आहे. (Mithun Chakraborty) अनेक चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या लाडक्या अभिनेत्यासाठी विविध पोस्ट शेअर केल्या आहेत. या पोस्टच्या माध्यमातून चाहते मिथुन यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत.
रुग्णालयाकडून अद्याप हेल्थ अपडेट नाही
(Mithun Chakraborty) अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना छातीत दुखू लागल्यामुळे कोलकात्यातील एका खासगी रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर काही वृत्तानुसार, त्यांना ब्रेक स्ट्रोक झाल्याची माहिती देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत सर्वांचे लक्ष आता रुग्णालयाकडून येणाऱ्या हेल्थ बुलेटिनकडे लागले आहे. दरम्यान, रुग्णालयाने अद्याप मिथुन यांच्या प्रकृतीविषयी कोणतीही अपडेट दिलेली नसली. मात्र, लवकरच रुग्णालय त्यांच्या प्रकृतीसंदर्भात हेल्थ बुलेटीन जारी करेल असे सांगण्यात येत आहे.
अभिनेते मिथुन चक्रवर्ती हे केवळ बॉलिवूड सिनेविश्वात नव्हे तर इतर अनेक भाषिक इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहेत. हिंदीसह त्यांनी बंगाली, भोजपुरी, ओरिया आणि तमिळ अशा विविध भाषांमधील कलाकृतींसाठी काम केले आहे. त्यामुळे मिथुन यांचा चाहता वर्ग फार मोठा आहे. तसेच कलाविश्वातील त्यांची कारकीर्द भव्य आणि अत्यंत प्रेरणादायी आहे. (Mithun Chakraborty) सिनेविश्वात त्यांना ‘मिथुन दा’ या नावाने संबोधले जाते. मिथुन चक्रवर्ती यांच्या कारकिर्दीची दखल घेत त्यांना काही दिवसांपूर्वीच मानाचा ‘पद्मभूषण पुरस्कार’ देण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी मिथुन यांनी संपूर्ण कलाविश्वाचे आणि आपल्या चाहत्यांचे आभार मानले होते.