हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन | १ मे २०२० म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या हीरक महोत्सवी वर्षाची सुरुवात. गेल्या ६० वर्षांत आपले राज्य आणि आपली मराठी भाषा दोन्हीची परिस्थिती बदलली आहे. आज मोबाईल, इंटरनेट आणि कंप्यूटर म्हणजेच माहिती तंत्रज्ञानाशिवाय दैनंदिन कामे जवळ जवळ अशक्य आहेत, हे आपण अनुभवतो आहोत. अनेक प्रकारच्या डिजिटल उपकरणांवर मराठी भाषा वापरण्याचे प्रमाणही वाढत आहे. नागरिकांना मातृभाषेतून तंत्रज्ञान वापरता आल्यामुळे आता उच्च शिक्षित-टेक्नोसॅव्ही आणि सर्वसामान्य जनता यांच्यामधील डिजिटल दरी कमी होऊन वेळ-पैसे तर वाचतच आहेत आणि नवीन संधीही मिळत आहेत. ज्ञानाची देवाण-घेवाण माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मराठी भाषेतून व्हावी, तसेच इंटरनेटवर मराठीचा वापर वाढवून जगभरातील विविध क्षेत्रांतील ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत मराठी भाषेतून उपलब्ध व्हावे, या करिता महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL) प्रयत्नशील आहे. त्यासाठी महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून MKCL तर्फे ‘आय.टी.त मराठी’ या अभिनव अॅपची निर्मिती केली गेली आहे. जागतिकीकरणाच्या या जमान्यात मराठी भाषेच्या अस्तित्वासाठी, विकासासाठी, समृद्धीसाठी, अस्मितेसाठी आणि उन्नतीसाठी ‘आय.टी.त मराठी’ हे अॅप सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांना व नागरिकांना दैनंदिन जीवनात अतिशय उपयुक्त ठरणार आहे.
सध्याच्या परिस्थितीत जगावर म्हणजेच प्रत्येक माणसावर कोरोना व्हायरसमुळे महा भयंकर असे संकट ओढवले आहे, त्यामुळे घरी राहून आय.टी. तंत्रज्ञानाचा वापर हा महत्त्वाचाच ठरत आहे, हे नक्की. थोडक्यात आय.टी. तंत्रज्ञान हे जनसामान्यांच्या हातचे साधन बनले आहे. तरी केवळ भाषेची अडसर या कारणामुळे कोणी यात मागे पडू नये. संगणकावर व स्मार्टफोनवर मराठी भाषेचा वापर व्हावा यासाठी ‘आय.टी.त मराठी’ या अॅपची खूप मदत होऊ शकते.
‘आय.टी.त मराठी’ या अॅपमधील ठळक उपक्रम :–
१. गुगलचा वापर करून माहिती शोधणे व मराठी टायपिंग करायला शिकणे.
२. टंकलेखनापेक्षा मोबाईलवर मराठीत बोलून संदेश लिहिणे – Voice Typing
३. मराठीतून इतर कोणत्याही भाषेत व अन्य कोणत्याही भाषेतून मराठीत भाषांतर करणे – Translate
४. मराठीतून ई-लर्निंगसाठी वेगवेगळ्या अॅप आणि वेब साईटचा वापर.
५. मराठीतून दैनंदिन जीवन आणि व्यवस्थापन यासाठी वेगवेगळ्या अॅप आणि वेब साईटचा वापर.
६. मराठी वर्तमानपत्र ऑनलाईन वाचणे, सोशल मीडियावर मराठी वापरणे, मराठी भाषकांसाठी विविध उपयुक्त अॅप्स, मराठी ऑडियो बुक्स, मराठी कवितासंग्रह, मराठी शब्दकोश, इ.
विविध आयटी सुविधा, टूल्स व अॅप्स आपण मराठी भाषेतून वापरली तरच जागतिकीकरणाच्या काळात मराठी भाषा जगात ऐटीत राहू शकेल, म्हणून ‘जर ‘आयटी त मराठी (तरच) ऐटीत मराठी’!
www.mkcl.org/itmarathi या लिंकवरून तुम्ही हे अॅप डाऊनलोड करू शकता किंवा आय.टी.त मराठी’ असे टाईप करून हे अॅप गुगल प्ले-स्टोअरवरून विनामूल्य डाऊनलोड करू शकता. तसेच www.mkcl.org/marathi या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला याचा लाभ ऑनलाईनही घेता येईल.