औरंगाबाद : शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी मारहाण केल्याप्रकरणी रिक्षा चालकाने मंगळवारी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे. मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल करुन आपली समाजात बदनामी केल्यामुळे माझी मानहानी झाली आहे. काही एक चुक नसताना आमदाराने पोलिसांसमक्ष आपल्याला मारहाण केली. त्यामुळे त्यांच्याविरुध्द कारवाई करावी अशी तक्रार रिक्षा चालकाने पोलीस महासंचालक संजय पांडे, पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता आणि क्रांतीचौक पोलीस ठाण्यात केली आहे.
डेल्टा प्लस विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याची घोषणा सोमवारी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सकाळी केली होती. त्यामुळे भांबावून गेलेल्या नागरिकांनी बाजारपेठेत एकच गर्दी केली. विविध भागात वाहतुकीची कोंडी झाली होती. त्याचप्रमाणे सोमवारी दुपारी एकच्या सुमारास क्रांतीचौकात प्रचंड वाहतुक कोंडी झाल्यामुळे तेथून जात असलेल्या आमदार अंबादास दानवे यांनी वाहनातून उतरुन वाहतुक सुरळीत करण्यासाठी धाव घेतली. त्याचवेळी अचानक रिक्षा (एमएच-२०-ईएफ-३२२५) चालक अजय अशोक जाधव (रा. वेदांतनगर, व्यंकटेश कॉलनी, उस्मानपुरा) याने वाहतुक कोंडीतून भरधावपणे रिक्षा दामटविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रस्ता ओलांडून क्रांतीचौक पेट्रोल पंपाच्या कोप-यावर आलेले आमदार दानवे यांनी रिक्षा चालक अजय जाधवला थांबवून कानशिलात लगावली होती. तसेच शिवीगाळ देखील केली होती. या सर्व घटनेचा व्हिडीओ आमदार दानवे यांच्या कार्यकर्त्यांनी मोबाइलसह सोशल मिडीयावर व्हायरल केला होता.
दरम्यान, अजय जाधव याच्या तक्रारीनुसार तो मित्राचा रिक्षा घेऊन शहागंज, मोंढा येथे किराणा साहित्य व भाजीपाला आणण्यासाठी जात होता. मात्र, आमदार दानवे यांनी काही एक चुक नसताना मला शिवीगाळ व मारहाण केली. मी त्यांना माझी चुक काय असे विचारत होतो. त्यावेळी त्यांच्यासोबत पोलीस देखील होते. त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील मला शिवीगाळ केली. तो व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यामुळे माझी समाजात बदनामी झाली आहे. माझ्या आई-वडीलांना मित्र व नातेवाईक या प्रकाराबद्दल विचात असल्यामुळे माझी बदनामी झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करुन मला न्याय मिळवून द्यावा असे जाधव याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.