Friday, June 2, 2023

‘या’ कारणामुळे धोनीला मिळाली नाही फेयरवेल मॅच,10 महिन्यांनंतर झाला खुलासा

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीने 15 ऑगस्ट 2020 साली अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने आपल्या ट्विटरद्वारे निवृत्तीची घोषणा केली. 2019 साली न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड कप सेमी फायनलनंतर धोनीने एकही आंतरराष्ट्रीय मॅच खेळली नव्हती. या सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला होता. म्हणून धोनीचा शेवट गोड व्हावा, अशी इच्छा त्याच्या अनेक चाहत्यांनी बोलून दाखवली होती.

धोनीसारख्या महान खेळाडूला फेयरवेल मॅच का देण्यात आली नाही? असा सवाल अनेकांनी उपस्थित केला होता. त्याचे उत्तर 10 महिन्यांनंतर मिळाले आहे. भारताचे माजी निवड समिती सदस्य सरनदीप सिंग यांनी धोनीला फेयरेवल मॅच का मिळाली नाही, याचा खुलासा केला आहे. मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियात होणारा टी-20 वर्ल्ड कप कोरोना व्हायरसमुळे रद्द करण्यात आला, म्हणून त्याला फेयरवेल मॅच मिळाली नाही, असे सरनदीप सिंग यांनी सांगितले आहे.

धोनीने 2014 साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अचानक टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याने अचानक घेतलेल्या निवृत्तीमुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. यानंतर धोनीने 15 ऑगस्ट 2020 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त घेत असल्याचे अचानक सांगितले. एमएस धोनी हा भारताचा आतापर्यंतचा सगळ्यात यशस्वी कर्णधार आहे. टीम इंडियाने एमएस धोनीच्या नेतृत्वात 2007 सालचा टी-20 वर्ल्ड कप, 2011 सालचा वर्ल्ड कप, तसेच 2013 सालची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. एमएस धोनी हा आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकणारा एकमेव कर्णधार आहे.