आ. वरपुडकरांच्या सुनबाईच्या हस्ते शासकीय मदत वाटपाला आ.दुर्राणींचा आक्षेप !

Prerna Varpudkar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी : हॅलो महाराष्ट्र – ( गजानन घुंबरे) – पाथरी विधानसभेचे आ. सुरेश वरपुडकर यांच्या सुनबाई यांच्या हस्ते नैसर्गिक आपत्ती ग्रस्तांच्या मदत वाटपाला विधानपरिषद सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी यांनी विरोध दर्शवला असून प्रोटोकॉल नुसार मदत वाटप करावी अशी मागणी करणारे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे . आता या आक्षेपाची जिल्ह्यात राजकीय चर्चा रंगली आहे. पाथरी विधानसभा मतदारसंघांमध्ये येणाऱ्या सोनपेठ,मानवत व पाथरी तालुक्यामध्ये पूरग्रस्त व नैसर्गिक आपत्ती मध्ये मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना मागील काही दिवसांमध्ये शासकीय मदतीचे धनादेश उपविभागीय अधिकारी , तहसीलदार यांच्याकडून देण्यात आले .मदत वाटपाच्या जवळपास सर्वच ठिकाणी पाथरी विधानसभेचे आ. सुरेश वरपुडकर यांच्या सुनबाई सौ . प्रेरणाताई वरपुडकर या सदरील मदत वाटप करताना दिसून आल्या.

या वाटपाचे फोटोही माध्यमामध्ये छापून आलेले पाहायला मिळाले .परंतु हे सर्व घटनाबाह्य या व्यक्तीकडून करण्यात येत असल्याचे निदर्शनास आणून देत विधानपरिषद सदस्य व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी यासंदर्भात आक्षेप नोंदवत जिल्हाधिकाऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचे अनुदान ,धान्य किंवा आर्थिक मदतीचे वाटप करताना प्रोटोकॉल नुसार विधानसभेचे सदस्य अथवा विधानपरिषदेचे सदस्य यांच्या उपस्थितीत वाटप करण्यासंदर्भात एक निवेदन 6 ऑगस्ट रोजी परभणीच्या नूतन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना दिले आहे .

यावेळी निवेदनात म्हटले आहे की, पाथरी विधानसभा मतदार संघातील पुरग्रस्त , नैसर्गीक आपत्तीग्रस्त व्यक्तींना शासनाकडुन आर्थिक मदत , धान्य वाटप किंवा नैसर्गीक आपत्तीत मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना आर्थिक मदत वाटप करण्यात येते . हे शासन अनुदान त्या – त्या मतदार संघाचे विधानसभा सदस्य किंवा विधानपरिषद सदस्य असे लोकप्रतिनीधी असणाऱ्या व्यक्तीकडुन लाभार्थ्यांना वाटप करावे , असा शासन नियम व प्रोटोकॉल आहे . पाथरी विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा सदस्य आ. सुरेशराव वरपुडकर यांच्या स्वहस्ते असे शासकीय वाटप करण्यात यावे , हा प्रोटोकॉल मान्य आहे . ते स्वत : उपस्थित नसतील तर विधानपरिषद या वरिष्ठ सभागृहाचा सदस्य म्हणुन माझ्या हस्ते वाटप व्हावे , हा प्रोटोकॉल आहे . असे असतांना पाथरी विधानसभा मतदार संघातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार,हे प्रोटोकॉल व शासन नियमांचा भंग करीत श्रीमती प्रेरणा वरपुडकर यांच्या हस्ते किंवा उपस्थितीत हे शासकीय अनुदान,धान्य किंवा आर्थीक मदतीचे वाटप करीत आहेत, हा नियम भंग आहे.

याकडे आपले लक्ष वेधीत आहे. तरी पाथरी विधानसभा मतदार संघातील कोणत्याही आपत्तीग्रस्त / नैसर्गीक आपत्तीत किंवा इतर कोणतेही शासकीय मदत वाटप किंवा इतर कार्यक्रमात विधानसभा सदस्य म्हणुन आ. सुरेशराब वरपुडकर किंवा मी यांच्या शिवाय इतर कोणत्याही घटना बाह्य व्यक्तीकडुन वाटप करण्यात येऊ नये . या नियमभंग व नियमबाह्य प्रकरणी तात्काळ संबंधीत अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी व तशा सुचना संबधीतांना देण्यात याव्यात .

कोण आहेत प्रेरणा वरपुडकर ?
आ .दुर्राणी यांनी ज्यांच्या उपस्थित शासकिय मदत वाटपाला आक्षेप घेतला आहे त्या सौ .प्रेरणा वरपुडकर कोण आहेत ? असा प्रश्न वाचकांना पडला असेल तर आ .सुरेश वरपुडकर यांच्या त्या सुनबाई आहेत हे लक्षात आले असेलच . याशिवाय त्या युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस आहेत . नुकत्याच झालेल्या परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये त्या संचालक म्हणून निवडून आल्या आहेत .सोबतच वरपुडकर कुटुंबीयांकडून चालवण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक संस्था यांची देखरेख त्या करतात .मुख्य म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीत व त्यानंतरही मतदार संघात काँग्रेस पक्षाच्या बांधणीत त्यांचा मोलाचा सहभाग आहे. आ .सुरेश वरपुडकर यांच्यापेक्षा मतदार संघात प्रेरणा वरपुडकरयांची देखरेख जास्त असते .त्यामुळेच बहुतेक कार्यक्रमांना त्यांची हजेरी असते .नैसर्गिक आपत्ती मदत वाटपामध्ये त्यामुळेच त्या दिसून येत होत्या .नेमकी हिच उपस्थिती आता प्रोटॉकल चा भंग करणारी ठरली आहे.