आ. जयकुमार गोरेंना दिलासा नाही, चुकीची माहिती पसरवत आहेत : महादेव भिसे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

मायणी येथील मृत व्यक्तीला जिवंत दाखवून त्याची जमीन बोगस कागदपत्रांच्या आधारे गोरेंनी घेण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणात आ. गोरे यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा मिळालेला नाही. परंतु जनतेमध्ये सहानुभूती मिळवण्याकरिता साळसुदपणाचा आव आणून गोरे यांचे वकील अॅड. खोत हे चुकीची माहिती पसरवत असल्याचा आरोप याप्रकरणातील तक्रारदार महादेव भिसे यांनी केला आहे.

आमदार जयकुमार गोरे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वडूज येथील न्यायालयात जामीनासाठी त्यांनी अर्ज केला होता. मात्र, वडूज येथे जिल्हा न्यायालयात त्यांचा जामीनअर्ज नामंजूर झाल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तिथेही त्यांना दिलासा मिळाला नसल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. परंतु, तेथेही आमदार गोरे यांना अपयश आले असून सर्वोच्च न्यायालयाने गोरे यांना वडूज येथील न्यायालयात हजर राहून जामीन करून घेण्याचे आदेश दिलेले आहेत.

तक्रारदार महादेव भिसे म्हणाले, आ. जयकुमार गोरे व त्यांचे वकील हे जनतेमध्ये सहानुभूती मिळवण्यासाठी साळसुदपणाचा आव आणून चुकीची माहिती सोशल माध्यमातून पसरवत असल्याचे दिसून येत आहे. वस्तुस्थिती पाहता आ. गोरे यांना एक महिन्याच्या अटकेपासून संरक्षण दिल्याचे न्यायालयाने आदेशात कुठेही नमुद केलेले नाही. तरीही स्वत:ची कातडी बचावण्यासाठी त्यांच्याकडून लोकांच्यात संभ्रम पसरवला जात आहे. त्यांच्याकडून सुरू असलेला सहानुभूतीसाठीचा खटाटोप म्हणजे न्यायालयाचा अपमान असून याबाबत वकीलांशी बोलून पुढची दिशा ठरवली जाईल. आ.गोरेंना त्यांच्या कर्मावर खरच विश्वास असेल अन् ते न्यायव्यवस्थेचा आदर करत असतील तर त्यांनी वडूज येथील न्यायालयात हजर होणे अपेक्षित आहे. तरीही सोशल मिडियाच्या माध्यमातून थिल्लरपणा करण्यात ते धन्यता मानत असल्याचेही भिसे यांनी म्हटले आहे.

Leave a Comment