मराठा प्रवीण पिसाळ यांच्या कुटुंबियांना महेश लांडगे यांची मदत; कर्तव्यनिधी म्हणून 5 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द

0
111
pravin pisal mahesh landage
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
जगभरातील मराठा बांधवांना संघटित करुन आर्थिक आणि सामाजिक उन्नतीचे कार्य उभा करणारे दिवंगत मराठा प्रवीण पिसाळ यांच्या कुटुंबियांना आमदार महेश लांडगे यांनी मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्वस्तरातून कौतूक होत आहे. सातारा जिल्ह्यातील प्रवीण पिसाळ या तरुणाने मराठा समाजासाठी संघटन करुन ‘वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन’ ची स्थापना केली. त्या माध्यमातून समाजातील तरुणांना नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहण्याची प्रेरणा दिली. वैद्यकीय, रोजगार आणि व्यवसायात मदतीसाठी पुढाकार घेतला. मात्र, प्रवीण पिसाळ यांचे नुकतेच अकाली निधन झाले. त्यामुळे समस्त मराठा समाजासह पिसाळ कुटुंबियांचे कधीही न भरून येणारे असे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी पिसाळ कुटुंबियांच्या घरी भेट दिली आणि सांत्वन केले. तसेच, कर्तव्यनिधी म्हणून ५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला आणि पिसाळ यांची मुलगी शुभ्रा हिच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचा मनोदय व्यक्त केला.

प्रवीण पिसाळ यांनी मराठा समाजातील तब्बल एक कोटीहून अधिक तरुणांचे भक्कम संघटन उभे केले आहे. त्यांच्या संघटनकौशल्यामुळे महाराष्ट्रभर तसेच देश विदेशातील मराठी तरुणांनाही प्रेरणा व बळ मिळाले आहे. सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठीचा त्यांचा लढा समाजाला दिशा देणारा आहे. कोरोना काळामध्ये त्यांनी महाराष्ट्रभर केलेली मदत अविस्मरणीय आहे. कुणालाही कधीही कसलीही मदत लागली, तर प्रवीण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. त्यामुळे पिसाळ कुटुंबियांच्या पाठीशी राहणे, हे आपले कर्तव्य आहे, अशा भावना आमदार लांडगे यांनी व्यक्त केल्या.

प्रवीण पिसाळ यांच्या आईला आश्रू अनावर-

घर- प्रपंचापेक्षा मराठा समाजातील तरुणांच्या मदतीसाठी तत्पर राहणार मुलगा अचानक सोडून गेला. पिसाळ कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यामुळे संपूर्ण राज्यातील मराठा समाजाकडून आधार देण्याचा प्रयत्न होत आहे. आमदार महेश लांडगे यांनीही घरी भेट दिली. आर्थिक मदत करीत यापुढील काळात कुटुंबाला मदतीसाठी पुढाकार घेण्याचा मनोदय केला. विशेष म्हणजे, प्रवीण पिसाळ यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे प्रवीण पिसाळ यांच्या आईचा उर भरुन आला. त्यांनी अक्षरश: हंबरडा फोडला. तसेच, प्रवीणने मराठा समाजासाठी सुरू केलेल्या कार्यात आता आमदार महेश लांडगे यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन उपस्थित ग्रामस्थांनी केले.