आमदार रत्नाकर गुट्टेंची 255 कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त

औरंगाबाद – 635 कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल असलेले रासपचे गंगाखेड चे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याशी संबंधित कंपन्यांची 255 कोटी रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने ताब्यात घेतली आहे. 2020 मध्ये या मालमत्तेवर टाच आणली होती.

आमदार गुट्टे यांनी गरीब शेतकऱ्यांच्या नावाने कृषी कर्ज घेऊन ती रक्कम आपल्या विविध कंपन्यांमध्ये गुंतवण्याचा आरोप आहे. 2012 ते 13 आणि 2016 ते 17 दरम्यान बँकाकडून ही कर्जे घेतली होती. यानंतर ईडीने 635 कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणात आमदार गुट्टे यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंग कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

ईडीने कारवाई करत गुट्टे यांच्याशी संबंधित गंगाखेड शुगर आणि एनर्जी लिमिटेड साखर कारखाना आणि यंत्रसामग्री, शिवाय योगेश्वरी हॅचरीज आणि गंगाखेड सोलर पावर लिमिटेड या तीन संलग्न कंपन्यांची सुमारे पाच कोटी रुपयांची जमीन, बँकांमधील सुमारे दीड कोटींची गुंतवणूक, तसेच गंगाखेड शुगर्सचे एक कोटीहून अधिक रुपयांचे समभाग अशा परभणी, बीड आणि धुळ्यातील 255 कोटींच्या मालमत्तेवर 2020 मध्ये टाच आणली होती. पुढे ईडीने कायदेशीर प्रक्रिया पार पाडत न्यायालयाच्या परवानगीने ही मालमत्ता ताब्यात घेतली आहे. त्यानुसार ईडी अधिक तपास करत आहे.