हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून अमरावतीतील राणा दाम्पत्य सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करत असतात. त्यातच आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून पनवती लागलीय अस वादग्रस्त वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केल्यानंतर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यात सतत संकटं येत आहेत. ‘करोनाचे सगळ्यात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यानंतर कोकणात चक्रीवादळ आलं. पूर आला. अनेक गावं बुडाली. लोक मरण पावले. कधी नव्हे ते मुंबईत चक्रीवादळ आलं. विदर्भात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालं. शेतकरी आत्महत्या करताहेत. उद्धव ठाकरे यांनी जेव्हापासून कारभार सुरू केला, तेव्हापासून हे सुरू आहे,’ असं राणा म्हणाले.
अमरावती जिल्ह्यातून करोनाची दुसरी लाट सुरू झाली तरीही मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षांमध्ये अमरावतीमध्ये पाय सुद्धा ठेवला नाही. वारंवार विनंती करूनही त्यांनी ऐकलं नाही. वारंवार सांगूनही जे ऐकत नाहीत, त्याला आपल्याकडं बेशरम म्हणतात. त्यामुळं ‘मातोश्री’वर बेशरमेचं झाड लावावं लागेल अशी घणाघाती टीका रवी राणा यांनी केली.