हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार पावसामुळे अतिवृष्टी निर्माण झाली आहे. सगळीकडे पूरस्थिती मुळे लोकांचं स्थलांतर करण्याचं काम चालू असून नागरिकांचे अतोनात हाल झाले आहेत. कोकणात अनेक ठिकाणी दरडी कोसळून लोक मृत्युमुखी पडले आहेत. दरम्यान, अशा वेळी महाराष्ट्रावर नैसर्गिक आपत्ती ओढवली असताना एकाही बॉलिवूड कलाकाराला साधं ट्विटही करावंसं वाटत नाही, याचं आश्चर्य वाटतं, असं ट्विट महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केलंय.
इतर राज्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीनंतर बॉलिवूडमधून मदतीसाठी अनेक जण पुढे येतात. माझ्या राज्यात पूर आल्यानंतर एकाही कलाकाराला साधं ट्विटही करावसं वाटलं नाही, याचं आश्चर्य वाटतं… अनेक स्वयंसेवी संस्थांनी मदत कार्य सुरु केलेलं आहे. आमचे महाराष्ट्र सैनिकही झटत आहेत… अशा वेळी माझ्याच राज्यात राहून मोठं झालेल्या बड्या बॉलीवूड तार्यांनी थोडं संवेदनशील व्हावं आणि मदत कार्याला हातभार लावावा, असं जाहीर आवाहन अमेय खोपकर यांनी केलं आहे.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) July 24, 2021
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी मनसैनिकांना पत्राद्वारे आवाहन केले होते. सध्याच्या परिस्थितीत सर्व महाराष्ट्र सैनिकांनी त्यांना जितकं जमेल तितकी मदत पूरग्रस्तांना करावी असे आवाहन राज ठाकरेंनी केलं होतं. आत्ता लोकांचा जीव महत्वाचा आहे आणि नंतर जसजसा पूर ओसरेल तसा रोगराईचा धोकाही वाढू शकेल. तुम्ही लक्ष घालून अत्यंत तातडीनं योग्य ती मदत तिथे पोचेल हे पहावे. काम करताना स्वत:ची काळजीही घ्यावी असेही राज ठाकरेंनी म्हंटल होत.