राज ठाकरेंची मनसे विधानसभा निवडणूक लढणार ; स्वतः राज ठाकरेंनी केली उमेदवारांची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | काँग्रेस राष्ट्र्वादीने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील आज मनसे विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच मंत्रालयात विष घेऊन आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील हे मनसेकडून विधानसभा निवडणूक लढणार आहेत असे स्वतः राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे.

वांद्रे येथील एमआयजी क्लब मध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्याला संबोधित करताना राज ठाकरे यांनी नरेंद्र पाटील आणि नाशिकचे शिवसेना नगरसेवक दिलीप दातार यांना मनसे मध्ये पक्ष प्रवेश दिला. त्यानंतर राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले त्याच प्रमाणे नरेंद्र पाटील आणि दिलीप दातार हे मनसेचे उमेदवार असणार आहेत असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान मनसे किती जागा लढवणार या प्रश्नाचे उत्तर मात्र राज ठाकरे यांनी दिले नाही. त्याच प्रमाणे ५ ऑक्टोम्बर रोजी आपण पहिली जाहीर सभा घेणार आहोत त्या सभेचं आपणाला सर्व चित्र स्पष्ट दिसेल असे राज ठाकरे म्हणाले आहेत. मात्र त्या सभेचे ठिकाण कोणते असेल हे मात्र राज ठाकरे यांनी सांगितले नाही.