औरंगाबाद | दहा दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत दोन दिवसाआड पाणी न सोडल्यास मनपा प्रशासकांच्या नळाचे कनेक्शन तोडण्यात येईल असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला होता. आल्टीमेंटम संपताच आदेशाची दखल न घेतल्यामुळे आज पहाटेच्या अंधारात कटर मशीनच्या सहाय्याने मनपा प्रशासकांच्या नळाचे कनेक्शन मनसे सैनिकांनी कट केले आहे.या आंदोलनामुळे मनसे ऍक्शन मोड मध्ये आल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे.
शहराला काही भागात तीन तर काही भागात आठ दिवसांनंतर मनपा कडून पाणीपुरवठा होत असल्यामुळे पाणी प्रश्नावर मनसे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. यामुळे मनसेच्या सैनिकांनी याची दखल घेत मनपा प्रशासनाला त्यांच्या घराचे नळ कनेक्शन तोडणार असल्याचा इशारा दिला होता. परंतु 10 दिवस पूर्ण होऊनही प्रशासनाने मागणी पूर्ण न केल्याने मनसेच्या वतीने आज पहाटे पाच ते सहा वाजेच्या दरम्यान विभागीय आयुक्त कार्यालय जवळील मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांच्या सरकारी निवासस्थानाचे पाणी कनेक्शन तोडले आहे.हे आंदोलन जिल्हासंघटक बिपीन नाईक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा संघटक वैभव मिटकर,उप शहर अध्यक्ष राहुल पाटील,मनवीसे जिल्हा संघटक संकेत शेटे, मनीष जोगदंड, प्रशांत दहिवालकर आदीनि केले.
आयुक्तांनाही सर्वसामान्यांचा त्रास समजावा हीच भावना
घरात पाणी नसले की परिवारामध्ये काय अडचणी उद्भवतात याची जाणीव मनपा आयुक्तांना व्हावी आणि सर्वसामान्यांचे पाण्याविना जगणे किती कठीण आहे हे समजावे यासाठी हे आंदोलन केले – बिपीन नाईक जिल्हा संघटक.
तक्रारीनुसार गुन्हा दाखल होईल.
मनसेच्या वतीने विनापरवानगी आंदोलन करण्यात आले आहे.या प्रकरणी सकाळपर्यंत तक्रार देण्यात आलेली नाही.तक्रार प्राप्त होताच संबंधित आंदोलका विरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल.
– संभाजी पवार, पो.नि.सिटीचौक