औरंगाबाद – सप्टेंबच्या शेवटच्या आठवड्यात संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले होते. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीनसह अनेक पिकं वाहून गेली. तर काही भागात जमीनही खरडून गेली आहे. त्यामुळे पंचनाम्याच्या सोपस्कार पार न पाडता शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात येत आहे. त्यासाठी आज औरंगाबादेत विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मनसेकडून धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1803919046460055/
पंचनाम्याची नाटकं बंद करा आणि शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी 50 हजाराची मदत करा, अशी आक्रमक मागणी मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. मनसेकडून औरंगाबादेत आज धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. तसेच मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. यावेळी महाविकास आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.
दरम्यान, लखीमपूर हिंसाचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला मनसेनं विरोध केला होता. जनतेच्या जीवाशी खेळ करुन राजकारणाची पोळी भाजणारी महाभकास आघाडी. उत्तर प्रदेशात शेतकरी आंदोलनात जो दुर्दैवी प्रकार झाला त्याचा कितीही निषेध केला तरी कमीच आहे, पण म्हणून ‘महाराष्ट्र बंद’ पुकारुन राज्य सरकार काय साध्य करतंय? गाड्यांची तोडफोड करणारे, जबरदस्ती करुन दुकानं बंद करायला लावणारे ही गुंडशाही का आपल्या उरावर बसलेय? कोरोनातून आत्ता कुठे सगळे सावरत असताना जखमेवर मीठ चोळणारे किती विकृत मनोवृत्तीचे असतील!, अशा शब्दात मनसे नेते अमेय खोपकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.