टेंडर सुरु होण्यापूर्वीच बेस्ट प्रशासनाने त्वरित रद्द करावे; मनसेच्या शिष्ठमंडळाची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक वर्षांपासून बेस्ट समिती महापालिकेचे सत्ताधारी असलेल्या शिवसेना पक्षाकडे आहे. बस कंडक्टर पुरविण्याचे काम मे. मातेश्वरी ट्रान्सपोर्ट या कंपनीला देण्यात आले असून ते अद्याप सुरु झालेले नाही म्हणूनच अश्या पद्धतीचे टेंडर सुरु होण्यापूर्वीच बेस्ट प्रशासनाने त्वरित रद्द करावे व नव्याने सुधारित टेंडर काढावे, अशी मागणी मुंबईत मनसेच्या शिष्ठमंडळाने आज शिवसेना नगरसेवक/बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांच्याकडे केली आहे.

मनसे कामगार सेनेचे कार्याध्यक्ष संतोष धुरी व चिटणीस केतन नाईक यांच्या नेतृत्वातील मनसेच्या शिष्ठमंडळाने आज शिवसेना नगरसेवक/बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांची कुलाबा येथील बेस्ट भवन येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी कोव्हीड काळात लोकल सेवा बंद असताना याच कंत्राटी कामगारांनी बेस्ट बसेसवर अवलंबून असणाऱ्या मुंबईकरांना आपला जीव धोक्यात घालून सेवा पुरविली. परंतु या कामगारांना कामावर येण्यासाठी बेस्ट प्रशासन साधा मोफत बेस्ट प्रवास देखील देण्यास तयार नाही, अशी खंत बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांच्याकडे व्यक्त केली.

सध्याच्या स्थितीत मे. एम.पी. ग्रुप (पुणे),मे.मारुती ट्रॅव्हल्स (अहमदाबाद),मे. हंसा सिटीबस (नागपूर) अश्या कंपन्यांनाच्या मार्फत कंत्राटी कामगार व बसेस पुरविल्या जात आहेत. परंतु, या बसेसवर बस कंडक्टरचे काम मात्र बेस्ट उपक्रमातील कायम कामगार करीत आहेत. मग आत्ताच बस कंडक्टर कंत्राटी पद्धतीने का घेण्यात येत आहेत? असा प्रश्न मनसे पदाधिकाऱयांनी यावेळी उपस्थित केला आहे. ज्या अधिकाऱ्यांनी हे टेंडर बनवले त्याच अधिकाऱ्यांनी बेस्टची नोकरी सोडून नव्याने टेंडर मिळालेल्या कंपनीची नोकरी स्वीकारली आहे, अशी माहिती मिळाल्याने हा कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार असल्याचे केतन नाईक यांनी सांगितले.