हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या महायुतीला राज ठाकरेंच्या रूपाने चौथ इंजिन लागलं आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) महायुतीला बाहेरून पाठिंबा दिला होता. महायुतीच्या जागावाटपात मनसेच्या वाट्याला एकही जागा आली नाही तरीही राज ठाकरेंनी महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या आणि जास्तीत जास्त खासदार निवडून आणा असं आवाहन मनसैनिकांना केलं होते. या सगळ्याच्या बदल्यात आता आगामी विधानसभा निवडणुकीत (Assembly Election 2024) मनसेने महायुतीकडे 20 जागांची मागणी केल्याची चर्चा सुरु आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबत बातमी दिली आहे.
मनसेने कोणत्या जागा मागितल्या ?
मनसेने महायुतीकडे मागितलेल्या 20 जागांमध्ये वरळी, दादर माहिम, शिवडी, मागाठाणे, दिंडोशी, जोगेश्वरी, वर्सोवा, घाटकोपर पश्चिम, चेंबूर, ठाणे, भिवंडी ग्रामीण, कल्याण ग्रामीण, नाशिक पूर्व, वणी, पंढरपूर, औरंगाबाद मध्य आणि पुणे या जागांचा समावेश असल्याची माहिती आहे. वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात मनसेचे संदीप देशपांडे यांना मैदानात उतरवलं जाण्याची शक्यता आहे. तर दादरमधून नितीन सरदेसाई आणि वर्सोवातून शालिनी ठाकरे इच्छुक आहेत असं बोलल जातंय. 2019 विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार दिला नव्हता. मात्र आता मनसे उमेदवार देण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यात आधीच भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटातच जागावाटपावरून रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. त्यात रामदास आठवले यांची रिपाई सुद्धा आहे. सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती संघटना आहे. त्यात आता मनसेची भर पडल्याने महायुतीतील जागावाटपाचा तिढा आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यात विधानसभेच्या २८८ जागा आहेत. त्यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभेच्या जागावाटपात सुद्धा घोळ पाहायला मिळतोय कि आधीच्या चुकांतून धडा घेत महायुती विधानसभेचे जागावाटप लवकरात लवकर उरकून घेते हे पाहायला हवं.