हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची दिल्लीत भेट घेतली. लोकसभा निवडणूक २०२४ साठी मनसे भाजपप्रणीत एनडीए मध्ये (MNS- BJP) सामील होणार अशा चर्चा त्यानंतर जोर धरू लागल्या. अमित शहा यांची भेट घेतल्याने मनसेचा महायुतीतील प्रवेश निश्चित झाला असून केवळ घोषणा बाकी आहे. मात्र दिल्लीतील बैठकीत राज ठाकरे यांनी अमित शाह यांच्याकडे महाराष्ट्रातील २ लोकसभा मतदारसंघाची मागणी केली आहे. यामध्ये ईशान्य मुंबई आणि शिर्डी किंवा नाशिकचा समावेश आहे.
युतीच्या दिशेने जाण्यासाठी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज ठाकरेंच्या ३ सकारात्मक बैठका पार पडल्या. यावेळी दोन्ही पक्षाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर दिल्ल्लीत जाऊन अमित शहांची भेट घेण्याचे ठरलं. त्यानुसार फडणवीस यांनी शहा आणि राज ठाकरे यांच्या भेटीचे आयोजन केले. या भेटीत राज ठाकरेंनी अमित शाह यांच्याकडे दक्षिण मुंबई आणि अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी या मतदारसंघाची मागणी केली. सध्या या दोन्ही जागा शिवसेनेच्या आहेत. मात्र भाजप दक्षिण मुंबईची जागा मनसेसाठी सोडू शकते. परंतु याठिकाणी राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी लोकसभेच्या रिंगणात उतरावे अशी भाजपची मागणी आहे. सध्या याठिकाणी ठाकरे गटाचे अरविंद सावंत खासदार आहेत.
तर दुसरीकडे शिर्डी मतदारसंघाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हे शिंदे गटात आहेत. त्यामुळे जर हा मतदारसंघ मनसेसाठी सोडला तर बाळा नांदगावकर याठिकाणी उभे राहू शकतात. महायुतीतीलच घटक पक्ष असलेल्या आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सुद्धा शिर्डीच्या जागेची मागणी यापूर्वी केली होती, त्यामुळे इथे पेच उभा राहण्याची शक्यता आहे. अशावेळी भाजप मनसेला लोकसभेसाठी १ जागा आणि त्याबदल्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जास्तीच्या जागा सोडण्याची शक्यता आहे.