साताऱ्यात मनसे आग्रही : पावनखिंड चित्रपटासाठी थिएटर 100% क्षमतेने खुली करण्याची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाच्या इतिहासाची सुवर्ण पाने उलघडणाऱ्या ऐतिहासिक चित्रपटांची बात काही औरच असते. कारण हा इतिहास प्रत्येक मराठी माणसाची आन, बान आणि शान आहे. त्यामुळे ऐतिहासिक चित्रपटांमधून जेव्हा हा इतिहास आपल्या समोर येतो. तेव्हा गर्वाने प्रत्येकाचा उर भरून येतो, म्हणूनच दिग्पाल लांजेकर यांनी ‘पावनखिंड’ या मराठी ऐतिहासिक चित्रपटातुन वीर बाजीप्रभूंची झुंज आणि निष्ठा दर्शविली आहे. हा चित्रपट येत्या 18 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे चित्रपटगृहे खुली करण्यात आली आहेत. मात्र केवळ 50% क्षमतेने म्हणून आता मनसेने अगदी मेट्रो सिटींपासून सर्वत्र राज्यात थिएटर 100% खुली करण्यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट कर्मचारी सेनेने चित्रपट गृहे 100% क्षमतेने खुली करण्याबाबत साताऱ्यात आग्रही भूमिका घेतल्याचे आज दिसून आले. दरम्यान सातारा जिल्हाध्यक्ष रोहित मोरे यांनी शुक्रवारी प्रदर्शित होणार्‍या “पावनखिंड” या चित्रपटासाठी 100% आसन क्षमतेने चित्रपटगृहे चालू करण्याबाबत प्रांत अधिकारी व चित्रपटगृहातील वरिष्ठ अधिकारी वर्गांना निवेदन दिले आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष चिन्मय गरगटे, कराड तालुका अध्यक्ष सचिन घाडगे, कराड शहर अध्यक्ष अक्षय कुंभार तसेच जिल्ह्यातील अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

याआधी मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही ट्विटरच्या माध्यमातून सरकारकडे चित्रपटगृहे 100 खुली करण्याबाबत आग्रही मागणी केली होती. त्यांनी लिहिले होते कि, राजकीय मेळाव्यांना खच्चून गर्दी आहे…रेस्टॉरंट्स, पब्जमध्ये तुडुंब पार्ट्या सुरु आहेत… मॉल्समध्ये खरेदीसाठी झुंबड उडालेली असते… पण तरीही नाट्यगृहं-चित्रपटगृहं अजूनही पन्नास टक्के क्षमतेनेच चालवायची असा महाआघाडी सरकारचा अजब न्याय आहे. हा अन्याय आतातरी सरकारने दूर करावा. ‘पावनखिंड’ सारख्या भव्य ऐतिहासिक चित्रपटापासून 100 टक्के आसनक्षमतेने चित्रपटगृहं सुरु करावीत, ही मनसे चित्रपटसेनेची आग्रही मागणी आहे.