फास्टॅगवरून मनसेच्या नेत्या रुपाली पाटलांचा किणी टोल नाक्यावर राडा

कोल्हापूर । देशातील सर्वच टोल नाक्यांवर आता आजपासून (बुधवार) फास्टटॅग बंधनकारक केले आहे. त्यामुळं मंगळवारी रात्री किणी टोलनाक्यावर फास्टटॅग नसलेल्या वाहनांच्या 5 ते 6 किलोमीटरच्या रांगा लागल्या. या वाहनांमध्ये एक गाडी मनसेच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांची सुद्धा होती. रात्री साडे नऊ दहाच्या सुमारास रुपाली पाटील पुण्याच्या दिशेनं निघाल्या होत्या त्यावेळी किणी टोल नाक्यावर ही वादावादी झाली. गेले कित्येक तास आपली गाडी जाममध्ये असून गाडी लवकर सोडण्यावरून रुपाली पाटील यांनी टोलवरील कर्मचाऱ्यांशी चांगलाच वाद घातला.

फास्टॅग लागू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक होते. त्यावेळी रुपाली पाटील किणी टोल नाक्यावरुन पुण्याच्या दिशेनं निघाल्या होत्या. पण टोल नाक्यावर प्रचंड मोठी रांग लागली होती. त्यामुळे वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत होतं. त्यामुळे रुपाली पाटील ठोंबरे यांनी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना जाब विचारला. त्यावेळी थोडी वादावादी झाल्याचंही पाहायला मिळालं. तेव्हा रुपाली पाटील यांच्या मदतीला टोल नाक्यावरील अन्य वाहन चालकही आल्याचं पाहायला मिळालं.

फास्ट टॅगसाठी काय करावं लागेल?
फास्ट टॅग देशभरातील कोणत्याही टोल बुथवर खरेदी करता येते. फास्ट टॅग खरेदी करण्यासाठी तुमच्या गाडीच्या रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्ससह आयडीची आवश्यकता आहे. याव्यतिरिक्त स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, पेटीएम पेमेंट्स बँक आणि आयडीएफसी फर्स्ट आदि बँकांसह 22 बँकांमधून खरेदी करु शकता. याशिवाय पेटीएम, अमेझॉन आणि फ्लिपकार्डसारख्या ई-कॉमर्स प्लेटफॉर्मवरही तुम्ही फास्ट टॅग खरेदी करु शकता. अनेक बँकांनी आपल्या मोबाईल अॅपवर फास्ट टॅग खरेदीवर डिस्काऊंट, एक्सक्लुसिव्ह ऑफर्स आणि कॅशबॅक ऑफर दिले आहे.

फास्ट टॅगची किंमत
फास्ट टॅगची किंमत दोन बाबींवर अवलंबून आहे. तुमच्याकडे वाहन कोणते आहे आणि तुम्ही कुठून फास्ट टॅग खरेदी करता यावर त्याची किंमत अवलंबून आहे. इश्यू फी आणि सिक्युरिटी डिपॉझिटची किंमत प्रत्येक बँकेची वेगळी असू शकते. फास्ट टॅग तुम्ही घरबसल्या खरेदी करु शकता.

स्थानिक गावकऱ्यांना फास्टॅग लागणार?
महामार्गाच्या परिसरातील स्थानिक गावकऱ्यांनाही फास्टॅग लागणार आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या 20 किलोमीटर परिसरात येणाऱ्या सर्व गावांतील लोकांना 275 रुपयांत महिनाभराचा फास्टॅग दिला जाईल. आपले आधारकार्ड दाखवून गावकरी हा सवलतीच्या दरातील फास्टॅग मिळवू शकतात.

 

You might also like