औरंगाबाद – मागील काही दिवसांपासून भोंगे उतरवण्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी 3 मेचा अल्टिमेटम दिला आहे. यानंतरही ज्या मशिदीवर भोंगे वाजतील त्या मशिदीसमोर हनुमान चालिसा वाजवण्यात येणार असल्याचा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. दरम्यान, आता मनसे कार्यकर्त्यांकडून भोंगे खरेदीला सुरवात झाली असल्याची माहिती मिळत आहे. औरंगाबादच्या सभेसाठी मनसेकडून 50 हून अधिक भोंगे खरेदी करण्यात आले आहेत. यामुळे अनेक चर्चाना उधाण आले आहे.
मनसेचे नेते बाळा नांदगावकर आज औरंगाबादच्या दौऱ्यावर असणार आहेत. मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत ते बैठक घेणार असुन औरंगाबाद पोलिस आयुक्तांनाही भेटणार आहेत. राज ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे मनसेकडून तयारी सुरू झाली आहे. ज्या मशिदीवर 3 तारखेनंतर भोंगे वाजतील त्याच्या समोरील मंदिरावर भोंगे लावून हनुमान चालीसा वाजवली जाणार आहे. तर ज्या मशिदीसमोर मंदिर नाही तेथे मनसे कार्यकर्त्यांच्या घरावर भोंगे लावण्यात येणार आहे. यासाठी औरंगाबादच्या मनसे कार्यकर्त्यांकडून स्वखर्चाने भोंगे खरेदी केले जात आहे.
नुकतेच पुण्याहुन 50 पेक्षा अधिक भोंगे औरंगाबादसाठी खरेदी करण्यात आल्याची माहिती मनसेच्या नेत्यांकडून सांगण्यात आली आहे. औरंगाबादेतील पदाधिकाऱ्यांनी 1500 ते 1800 रुपये दराने पुण्यातून 50 पेक्षा अधिक भोंग्यांची खरेदी केली आहे. तसेच हे भोंगे लेटेस्ट असून या भोग्यासाठी वीज लागत नाही. ते बॅटरीवर चालतात. भोंग्यांमध्येच ऑम्लिफायर असल्याने वेगवेगळ्या मशिन जोडण्याची गरज नाही. हे भोंगे पेनड्राइव्ह आणि ब्ल्यूटूथनेही कनेक्ट होतात. त्यामुळे सीडीची गरज पडत नाही. मोबाइलवरून हवी ती गाणी लावता येतात. वजनाने हलके असल्याने सहज उचलून गच्चीवर ठेवता येतात.