हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज जागतिक महिला दिन असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी महिलांना खास आवाहन केले आहे. तुम्ही कोणाचंही प्यादे बनून राहायची गरज नाही, तुम्ही स्वतःच सक्षम आहात अस राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे म्हणाले, आमचे आजोबा, प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे, “बांधवांनो, महिलांबद्दल जितका-जितका आदर तुम्ही आपल्या अंतःकरणात साठवाल आणि वाढवाल तितके शिवराय तुमच्यावर फार प्रसन्न होतील” त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जशी ३६५ दिवस साजरी व्हायला हवी तसंच महिलांचा म्हणजे खऱ्या अर्थाने ह्या जगतनियंत्याचा सन्मान ३६५ दिवस साजरा झाला पाहिजे. असो.
#महिलादिन#जागतिक_महिला_दिन#WomensDay#womenempowerment pic.twitter.com/jYF70awVnp
— Raj Thackeray (@RajThackeray) March 8, 2021
मी मागे एकदा एका भाषणात माता-भगिनींना उद्देशून जे बोललो होतो ते आज पुन्हा सांगतो; तुम्हाला कोणी सक्षम करण्याची गरज नाही तुम्ही स्वतः सक्षमच आहात. तुम्ही तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून आणि दुसऱ्या स्त्रीचं दुःख आपलं मानून कृती करू लागलात तर जगात कुठल्याच स्त्रीवर अन्याय होऊ शकणार नाही.
राजकारणात किंवा समाजकारणात कार्यरत असणाऱ्या महिलांनाही माझं आवर्जून सांगणं आहे तुम्ही कोणाचंही प्यादं बनून रहायची गरज नाही, तुम्ही थेट निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हा, तुम्हाला अपेक्षित बदल तुम्हीच घडवू शकता आणि जग बदलवू शकता.
बाकी पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’