हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘रत्नागिरी-राजापूर रिफायनरी’ म्हणजे नाणार प्रकल्पावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्रं लिहिलं आहे. रत्नागिरी-राजापूर रिफायनरी’सारखा प्रकल्प हातातून गमावणं ना कोकणाला परवडेल ना महाराष्ट्राला. राज्याचं दीर्घकालीन हित लक्षात घेऊन या प्रकल्पाच्या बाबतीत सरकारने सामंज्यस्याची भूमिका घ्यावी, असं आवाहन राज यांनी केलं आहे.
कोकणचं कॅलिफोर्निया होणार असं जेंव्हा जेंव्हा मी ऐकतो तेंव्हा मला त्याचा अर्थ कळत नाही. कारण खरं तर कोकणाला विकासाच्या कुठल्याच मॉडेलची गरज नाही उलट तेच जगातील विकासाचं एक उत्कृष्ट मॉडेल बनू शकतं. अर्थात ह्या दृष्टीने एक समग्र विचार कधीच झाला नाही जो आता व्हायला हवा असं मला वाटतं, असं राज ठाकरे म्हणाले.
आसपासची राज्यं महाराष्ट्राच्या घशात हात घालून उद्योग पळवून न्यायला टपलेली आहेत. अशा वेळेस महाराष्ट्राने ‘रत्नागिरी राजापूर रिफायनरी’सारखा सुमारे तीन लाख कोटी रुपयांचा प्रकल्प हातातून गमावू नये. हे महाराष्ट्राला आज परवडणारं नाही, अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडली आहे.
ह्या प्रकल्पाला काही स्थानिक भूमिपुत्रांचा विरोध होता. त्यांचं म्हणणं रास्त होतं. इथल्या जमिनी परप्रांतियांच्या घशात जाऊ शकतात ही त्यांची भीती होती जी काही प्रमाणात तेव्हा रास्तही ठरली. उद्या नवीन प्रकल्पामुळे निर्माण होणारा रोजगार आणि इतर उद्योग ह्यात कोकणी माणसाला स्थान कुठे असेल ही त्यांची शंका होती. काही पर्यावरणवाद्यांच्या मनातील ही भावना होती की कोकणाचा निसर्ग नष्ट होईल. त्यामुळेदेखील काही भूमिपुत्र चिंतेत होते. तिथे असलेल्या काही मंदिरांचाही प्रश्न होता. ह्या मंदिरांचं काय होणार हा विचार त्यांच्या मनाला नख लावत होता. हे प्रश्न, चिंता, शंका रास्त होत्या आणि आहेत. पण आज ह्यावर मार्ग काढणं आवश्यक आहे, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’