हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. माझ्यामागे ईडी लावली तर मी सीडी बाहेर काढेन, असे खडसे म्हणाले होते त्यामुळे खडसे सीडी कधी बाहेर काढतात, मी त्याचीच वाट पाहत असल्याचे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. ते पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत होते.
राज्यात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत असून काँग्रेसच्या कार्यकाळातही तेच झाले होते आणि आता भाजपही तेच करत आहे, असे म्हणत ईडीसारखी मोठी सरकारी यंत्रणा सरकारच्या हातातले बाहुले झाले आहे. त्यामुळे खरे गुन्हेगार मोकाट राहतात, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
यावेळी राज ठाकरे यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून देखील भाष्य केले. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण जर सर्वांनाच मान्य आहे तर अडले कुठंय?, असा सवाल त्यांनीं केला. तुम्ही कोर्टात आरक्षणाची बाजू व्यवस्थित का मांडत नाहीत? असा सवाल करत एकमेकांकडे बोट दाखवण्यापेक्षा एकदा या सर्वांना एका व्यासपीठावर आणा आणि विचारा, असं राज ठाकरेंनी म्हंटल.