सातारा | खंडाळा तालुक्यातील शिरवळ परिसरातील वीर धरणावर फिरायला आलेल्या पर्यटकांना लुटणाऱ्या दोन टोळीना अटक केली होती. या टोळीविरोधात मोक्कानुसार कारवाईचा प्रस्ताव पाठवला होता. त्या प्रस्तावाला विशेष पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी मंजुरी दिली आहे. दोन्ही टोळीवर अनेक जिल्ह्यात दरोडा, चोऱ्यांचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शिरवळ पोलिसांनी पाठवलेल्या प्रस्तावामध्ये टोळी प्रमुख महावीर सुखदेव खोमणे, सदस्य शाहरूख महमुल्ला बक्षी, अमिर मौलाली मुल्ला, भैय्या हुसेन शेख, मयूर अंकुश कारंडे (सर्व रा.तावशी, ता. इंदापूर, जि. पुणे) यांच्यासह एक अल्पवयीन युवकाचे नाव आहे. या टोळीने जानेवारी महिन्यात वीर धरणावर फिरायला आलेल्या पर्यटकांना लुटून किंमती ऐवज लुटून नेला होता. तेव्हा शिरवळ पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून सर्व संशयितांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर सोलापूर, पुणे, सातारा या जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी असे विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
फलटण ग्रामीण पोलिसांनी प्रस्ताव पाठवलेल्या टोळीतील आप्पा उर्फ रवि ज्ञानदेव माने (रा. तामशेतवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर), सदस्य पप्पू उर्फ सुहास किसन सोनवलकर (रा. वडले, ता. फलटण) यांनी सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, पुणे, मुंबईत जबरी चोरी, दरोडा, घातक हत्याराचा धाक दाखवून खंडणी मागणे यासारखे गुन्हे आहेत. वरील दोन्ही टोळीवर मोक्काचा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्यामार्फतीने विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या कार्यालयाकडे पाठवला होता. त्या प्रस्तावाला लोहिया यांनी मंजुरी दिली आहे. या कारवाईसाठी फलटणचे डीवायएसपी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवळ, फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.