हॅलो महाराष्ट्र । सरकारी हवाई वाहतूक कंपनी एअर इंडिया कंपनी मोदी सरकारनं विक्रीस काढली आहे. केंद्र सरकारची मालकी असलेली एअर इंडिया एप्रिलपूर्वीच खासगी कंपनी होणार आहे. एअर इंडियातील १०० टक्के मालकी हिस्सा विक्री करण्याच्या प्रक्रियेने दिल्लीत वेग घेतला असून सरकारने याविषयी सोमवारी माहिती उपलब्ध केली. सरकारनं कंपनीसाठी खरेदीदारांकडून प्रस्ताव मागवले असून, खरेदीसाठी प्रस्ताव दाखल करण्यासाठी १७ मार्च २०२० अखेरीची तारीख आहे. याचबरोबर सरकारनं ‘एअर इंडिया एक्सप्रेस’ आणि एअरपोर्ट सर्व्हिस कंपनी (AISATS) या दोन सरकारी अनुदानित कंपन्यासाठीही बोली मागवल्या आहेत.
गेल्या काही वर्षापासून कर्जामुळे डबघाईला आलेल्या सरकारी हवाई वाहतूक कंपनी एअर इंडियाला विकण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. केंद्र सरकारच्या निर्गुंतवणूक योजनेअंतगर्त ‘एअर इंडिया’ आणि ‘एअर इंडिया एक्सप्रेस’मधील १०० टक्के हिस्सा विक्री केला जाणार आहे. तसेच एअर इंडिया आणि सिंगापूर एअरलाईन्स यांच्यातील संयुक्त उद्यम असलेल्या AISATS या कंपनीतील ५० टक्के हिश्श्याची विक्री केली जाणार आहे. सरकारने सोमवारी निविदा प्रकियेतील महत्वाचा घटक असलेली माहिती जाहीर केली. या निर्गुंतवणूक योजनेत एअर इंडियातील इतर विभागांचेही टप्याटप्यात खासगीकरण केले जाण्याची शक्यता आहे. ‘एअर इंडिया असेट होल्डिंग लिमिटेड’ या स्वतंत्र कंपनीकडून या विभागांमधील हिस्सा विक्री केली जाईल. निविदा सादर करण्याची अंतिम तारीख १७ मार्च २०२० असून त्यानंतर ही प्रक्रिया वेग घेईल. साधारणपणे एप्रिलपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी सरकारने ७६ टक्के समभाग विक्रीसाठी प्रस्ताव मागवले होते. मात्र, सरकारला एकही खरेदीदार मिळाला नाही. लिलाव प्रक्रिया अपयशी ठरल्यानंतर त्यावर एक अहवाल मागवण्यात आला होता. त्या अहवालानुसार अटींमध्ये बदल करण्यात आले. काही वर्षांपासून एअर इंडिया तोट्यात आहे. साल २०१८-१९मध्ये कंपनीला ८ हजार ५५६ कोटींचा तोटा सहन करावा लागला. त्याचबरोबर कंपनीवर ५० हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज आहे.
ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा
हे पण वाचा-
बेरोजगारांच्या राष्ट्रीय नोंदणीसाठी युवकाचं आवाहन; नागरिकतेबरोबर नोकरीही गरजेचीच
काँग्रेसकडून पंतप्रधान मोदींना प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधान प्रत भेट